पत्नीला साधनेत साहाय्य करणारे पुणे येथील कै. प्रभाकर केसकर (वय ८४ वर्षे) आणि त्यांच्या मृत्यूनंतर सौ. रश्मी नाईक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘२६.११.२०२१ (कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमी) या दिवशी माझ्या यजमानांचे (प्रभाकर केसकर, वय ८४ वर्षे) घरी निधन झाले. रात्री झोपेतच त्यांचा प्राण गेला. ‘त्यांना अगदी शांतपणे मृत्यू आला. ते शेवटपर्यंत बोलत, चालत होते’, याचे मला समाधान वाटले. त्यांना असे मरण दिल्याबद्दल मी ईश्वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. २३.२.२०२२ या दिवशी त्यांचे तृतीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने मला यजमानांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर मला अन् माझ्या मुलीला (सौ. रश्मी नाईक हिला) जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्रीमती कल्पना केसकर (पत्नी, वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१. आई आणि लहान भावंडे यांचा प्रेमाने सांभाळ करणे : ‘यजमानांनी त्यांच्या आईच्या वृद्धापकाळात तिची मनापासून सेवा केली. यजमानांनी त्यांच्या दोन्ही भावांनाही प्रेमाने सांभाळले. (माझ्या मधल्या दिरांचे यापूर्वीच निधन झाले आहे.) माझे लहान दीर (श्री. जयंत केसकर, वय ६५ वर्षे) मनोरुग्ण आहेत. यजमानांची शारीरिक क्षमता नसूनही दळणवळण बंदीपूर्वी यजमान भावाला बरे वाटावे; म्हणून ते त्यांना बाहेर नेऊन आणायचे.
२. यजमानांचे समष्टी सेवेत मिळालेले साहाय्य : माझ्या साधनेच्या आरंभीच्या काळात यजमानांचा मला साधना आणि समष्टी सेवा करायला विरोध होता. नंतर त्यांनी मला गुरुपौर्णिमा अन् हिंदु राष्ट्र-जागृती सभा या वेळी सेवेला जाऊ दिले. काही वेळा तेही माझ्या समवेत या कार्यक्रमांना येत असत. मी यजमानांमुळेच नाशिक आणि प्रयाग येथे झालेल्या कुंभमेळ्यांच्या सेवेत सहभागी होऊ शकले. त्यांनी मला संस्थेला अर्पण करण्यासाठी कधीही अडवले नाही.
३. साधना : ते रात्री झोपतांना नेहमी विभूती लावून झोपत असत. ते मंत्रजप म्हणून अभिमंत्रित केलेले पाणी तीर्थ म्हणून घेत असत. ते कधीकधी कुलदेवी आणि श्रीगणेश यांचा नामजप करत असत.’
सौ. रश्मी नाईक (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), पुणे
१. ‘बाबांच्या मृतदेहाला शेवटचा नमस्कार करतांना ‘गुरुदेवांच्या हाताच्या ओंजळीत बाबांचा लिंगदेह आहे आणि तेच त्यांच्या लिंगदेहाला पुढच्या प्रवासाला घेऊन जात आहेत’, असे जाणवून माझे मन शांत झाले.
२. बाबांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर काही साधक घरी आल्यावर घरातील सर्वांचा ‘त्यांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेव घरी आले आहेत’, असा भाव होता. ‘प्रत्येक क्षणी गुरुमाऊली सतत आमच्या समवेत आहे’, असे आम्हाला जाणवत होते.
३. या काळात आईला काही काळ एकटीने रहावे लागले, तरीही तिची सिद्धता होती. ती सांगायची, ‘‘माझ्या समवेत रहाण्यासाठी अजून कुणाचा वेळ जायला नको. माझ्या समवेत प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत.’’ या सर्व प्रसंगात आई स्थिर असल्याने तिची काळजी वाटायची नाही.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१६.१.२०२२)