कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांचा आधार क्रमांक बँक खात्यास जोडला असल्यास साहाय्य मिळणार !
नाशिक – कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना शासनाकडून देण्यात येणारे ५० सहस्र रुपयांचे अनुदान आता त्यांच्या अधिकोषाच्या खात्यास आधारकार्डच्या क्रमांकाची जोडणी (लिंक) असेल, तर त्या आधारावरच मिळणार आहे. त्यासाठी संबधित अर्जदारांनी स्वतःचे आधार बँक खात्यास जोडावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
१७ फेब्रुवारी या दिवशी कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या वारसांना देण्यात येत असलेल्या अनुदानाचा आढावा सचिवांनी घेतला. त्यात अनेक अर्जदारांच्या आलेल्या अर्जांमध्ये बँक खाते अन् इतर गोष्टी यांची माहिती चुकीची किंवा अपूर्ण भरलेली होती. अनेकांकडून खाते क्रमांकात टंकलेखनाच्या चुका होत्या. त्यामुळे त्यांना साहाय्य मिळण्यास अडचणी आल्या. त्यामुळे सचिवांनी आधार क्रमांकाद्वारेच साहाय्य देण्याविषयी स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार वेळेत अर्ज केलेल्या; परंतु अजूनही साहाय्य प्राप्त न झालेल्या व्यक्तींना त्यांच्या बँक खात्यास आधार क्रमांक जोडावा लागेल. तसे केल्यास शासकीय यंत्रणेकडून त्यांच्या आधार क्रमांक जोडलेल्या खात्यात त्वरित साहाय्य दिले जाईल.