शिवाजी महाराजांचे नुसते स्मारक न उभारता त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे ! – नाना पाटेकर, अभिनेते

पुणे – अफझलखानाला मारले हा इतकाच इतिहास नाही. इतिहास तिथून चालू होतो. काही तथाकथित विद्वान आणि राजकारणी मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या स्वार्थासाठी वेगवेगळा मांडला आहे. आपण सर्वजण शिक्षित असून त्याची नेमकी माहिती आपल्याला असली पाहिजे. महाराजांचे स्मारक उभारणे सोपे आहे. त्यांची विचारसरणी, विचारांचे अनुकरण करण्यासाठी एक पाऊल जरी टाकता आले तरी मोठे आहे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

ते शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले त्या वेळी बोलत होते. या वेळी नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणादरम्यान राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले. या कार्यक्रमाला भाजप नेते गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

नाना पाटेकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. आपण सर्वांनी दैवते वाटून घेतल्याचे पुष्कळ वाईट वाटते. महाराज, आंबेडकर, टिळक माझेच आहेत. इतिहासाचा चांगला भाग घ्यावा आणि इतर काढून टाकावा. ब्राह्मण, ब्राह्मणेतर हा वाद आता नको.

२. माणूस म्हणून एकमेकांना ओळखू तेव्हाच या स्मारकांचा आदर होईल. येता-जाता रस्त्यात कुठलेही स्मारक उभे आहे असे नाही. ते महाराज आहेत. महाराजांचे स्मारक कुठे उभे करायचे, हे कळायला हवे. त्याच्यावरून वाद का होतात ? हे कळत नाही. हा आपला इतिहास आहे.

३. आपण प्रार्थना करतो तेव्हा त्यातून समाधान मिळते. कोणताही मोबदला नसतो.  स्मारके आपली प्रार्थना आहे. ही तुमच्या समाधानासाठी आहे. त्यांचे विचार तुम्ही घेतले हा त्याचा अर्थ आहे. नाही तर इतर स्मारकांप्रमाणे हेही एक स्मारक होईल. यावरून सलोखा वाढला पाहिजे, भांडणे नाही.