हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींना अटक करून कठोर शासन करावे !
श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन केली मागणी !
बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा यांच्या हत्येमागे असणार्या अपराध्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, बेंगळुरूचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. मोहन गौडा आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. हर्षा यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी धर्मांधांनी दगडफेक केल्याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
१. या वेळी माध्यमांशी बोलतांना श्री. मुतालिक म्हणाले की, कुर्हाड आणि तलवार घेऊन दंगल करायला हे तालिबान नाही, तर येथे राज्यघटना आहे. ही कर्नाटकातील हिंदु कार्यकर्त्यांची २५ वी हत्या आहे. हे प्रकरण वर्षानुवर्षे न चालवता १ मासात दोषींना शिक्षा करण्यात यावी.
२. श्री. मोहन गौडा म्हणाले की, हिजाब प्रकरणानंतर हिंदु कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी देणारे दूरभाष येत आहेत. आज हिजाब प्रकरण न्यायालयात असूनही धर्मांध संघटना कायद्याविरुद्ध कृत्ये करत आहेत. काँग्रेस नेता मुकर्रम खान हिजाबविषयी चिथावणी देणारी निवेदने देत आहेत. त्यांचा न्यायालयावर विश्वास नाही. अशा लोकांना तत्परतेने अटक करावी.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
१. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया या संघटनांवर बंदी घालून त्यांच्या प्रमुखांना कारागृहात डांबण्यात यावे.
२. मृत हर्षा यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी.
३. हिंदू कार्यकर्त्यांना, हिंदू नेत्यांना योग्य संरक्षण देण्यात यावे.