हुतात्मा सैनिक रोमित चव्हाण यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप !
सांगली, २१ फेब्रुवारी – जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा येथे १९ फेब्रुवारी या दिवशी आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण (वय २२ वर्षे) यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शिगाव येथे शासकीय सन्मानात २१ फेब्रुवारी या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी, तसेच ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ यांच्या वतीने कर्नल श्रीनागेश यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. हुतात्मा रोमित चव्हाण यांचे पार्थिव सकाळी ६.५० वाजता शिगाव येथे आणण्यात आले. या वेळी सहस्रोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.