विशाळगडच्या समस्येसंदर्भात लक्ष घालीन आणि जिल्हाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देईन ! – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री, महाराष्ट्र राज्य

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिल्यानंतर उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – विशाळगडची समस्या मला अवगत आहे. या संदर्भात मी लक्ष घालीन आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देईन, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच पुरातत्व विभागाकडून होणारे अक्षम्य दुर्लक्ष, यांसंदर्भात ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने २१ फेब्रुवारी या दिवशी मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सदस्य बाबासाहेब भोपळे म्हणाले, अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात वारंवार बैठका घेऊनही, तसेच जिल्हाधिकार्‍यांनी आदेश देऊनही प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून कोणतीच कृती होत नाही. त्यावर ठाकरे यांनी हे आश्वासन दिले.

या प्रसंगी कृती समितीचे सदस्य सुरेश यादव, शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, शिवसेनेचे कागल तालुकाप्रमुख अशोकराव पाटील आदी उपस्थित होते.