विनामूल्य; पण बहुमूल्य आयुर्वेदाची औषधे : काटेसावरीची फुले आणि मक्याच्या कणसांतील केस

१. काटेसावरीची फुले

काटेसावरीचे फुल

१ अ. ओळख : ‘साधारणपणे फेब्रुवारी – मार्च मासांत पाने नसलेला, पण तांबड्या रंगाच्या फुलांनी बहरलेला आणि खोडावर जाड काटे असलेला एक वृक्ष पटकन् नजरेत भरतो. याला काटेसावर म्हणतात. (छायाचित्र ‘१’ आणि ‘२’ पहा.) ही झाडे सर्वत्र आढळतात. फेब्रुवारी-मार्च मासांत या झाडाखाली पुष्कळ फुले पडलेली आढळतात. ही फुले गुरे फार आवडीने खातात. या झाडावर पुढे काही दिवसांनी बोंडे सिद्ध होतात. या बोंडांमधून कापूस निघतो. या कापसाचा उश्या, गाद्या इत्यादी बनवण्यासाठी उपयोग करतात. काटेसावरीचा कापूस थंड गुणधर्माचा असतो.

काटेसावरीचे झाड

१ आ. काटेसावरीच्या फुलांचे औषधी उपयोग : पुणे येथे श्री. अरविंद जोशी नावाचे विविध भारतीय उपचारपद्धतींचा अभ्यास करणारे एक सद्गृहस्थ आहेत. त्यांनी त्यांच्या संशोधक वृत्तीने या फुलांचे औषधी गुणधर्म शोधून त्यांचा अनेकांना लाभ करून दिला आहे. या फुलांपासून लाभ झाल्याची अनेक उदाहरणे त्यांच्याकडे आहेत. त्यांचा एक लेख वाचून मी काही रुग्णांना ही फुले दिली, तर त्यांनाही पुष्कळ लाभ झाल्याचे लक्षात आले. श्री. अरविंद जोशी यांनी हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केल्यामुळे मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

वैद्य मेघराज पराडकर

काटेसावरीच्या फुलांचा वापर पुढीलप्रमाणे करावा. झाडावरून स्वच्छ जागी पडलेली काटेसावरीची फुले गोळा करून न धुता उन्हात वाळवावीत आणि मिक्सरवर त्यांचे बारीक चूर्ण बनवून ठेवावे. हे चूर्ण सकाळ-सायंकाळ रिकाम्या पोटी प्रतिदिन १ चमचा या प्रमाणात घ्यावे. असे ३ मास करावे. ही फुले साधारण एक मासपर्यंतच उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ती गोळा करून त्यांचे चूर्ण बनवून ठेवावे. हे चूर्ण नियमितपणे घेतल्याने स्नायू, तसेच सांधे आणि हाडे यांचे दुखणे बरे होते, असा अनुभव आहे. संधीवात, गुडघेदुखी, जिना उतरतांना गुडघे दुखणे, पायांचे घोटे दुखणे किंवा सुजणे, खांदे दुखणे, कोपरे दुखणे, मनगटे दुखणे, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी विकारांमध्ये या चूर्णाचा पुष्कळ लाभ होतो.

२. मक्याच्या कणसांतील केस

थंडीच्या दिवसांत मक्याची कणसेही सर्वत्र उपलब्ध असतात. देहली येथील ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध वैद्यराज सुभाष शर्मा हे मक्याच्या कणसांवरील केसांचा मूत्रमार्गातील विकारांवर पुष्कळ वापर करतात. त्यांच्याकडून मला याचे गुणधर्म शिकता आले, यासाठी मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

मक्याचे केस प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर अप्रतिम औषध आहे. मुतखडे पाडण्यासाठीही यांचा उपयोग होतो. लघवीला जळजळ होणे, घशात आणि छातीत जळजळ होणे, लघवी थांबून थांबून होणे, लघवीला घाई होणे, लघवी चालू होण्यास वेळ लागणे, लघवी गढूळ होणे आणि लघवीला दुर्गंध येणे या विकारांमध्ये हे फारच उपयोगी आहेत. यांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.

मक्याच्या कणसांमध्ये असलेले केस टाकून न देता गोळा करून धुऊन उन्हात वाळवून ठेवावेत. आपल्या हाताची बोटे पूर्णपणे आत वळवून, त्यांची नखे त्याच तळव्याला टेकवल्यावर जी मूठ बनते, तिच्यामध्ये मावेल एवढ्या प्रमाणात (याला आयुर्वेदात ‘अंतर्नखमुष्टी प्रमाण’ असे म्हणतात.) मक्याचे केस घेऊन त्यामध्ये २ वाट्या पाणी घालून उकळून १ वाटी काढा बनवावा. हा काढा गाळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा. काढा बनवल्यावर जो चोथा शेष रहातो, त्यामध्ये सायंकाळी पुन्हा २ वाट्या पाणी घालून १ वाटी काढा बनवावा आणि तो घेऊन चोथा टाकून द्यावा. असे अधिकाधिक १ मास करावे. (त्यापुढे हे औषध चालू ठेवायचे असल्यास वैद्यांचा समादेश (सल्ला) घ्यावा.)’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी,  गोवा. (१३.२.२०२१)