आप, तेज आणि वायु या तत्त्वांची अन् शांतीची अनुभूती देणारा साक्षात् भूवैकुंठ असलेला रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम !

आश्रमांची निर्मिती करून साधकांची वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वाराणसी सेवाकेंद्रात सेवा करणार्‍या श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ६४ वर्षे)) यांना रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती भाग्यश्री आणेकर

१. रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना आलेल्या अनुभूती

१ अ. आश्रमातील स्वागतकक्षासमोरील लाद्यांवर ‘पाण्यात दिसावे’, तसे दिसणारे झाडांचे प्रतिबिंब पाहून आपतत्त्वाची अनुभूती येणे : ‘आश्रमाच्या स्वागतकक्षाच्या बाहेरील स्वच्छ काचेप्रमाणे चकाकणारी लादी पाहून ‘ही लादी नसून त्या ठिकाणी पाणीच आहे आणि त्यात दिसणारी झाडे हलत आहेत’, असे मला जाणवले. त्या लाद्यांवर पाण्यात ज्याप्रमाणे प्रतिबिंब दिसते, त्याप्रमाणे झाडांचे प्रतिबिंब दिसत होते. मला येथील निसर्ग पाहून संत तुकाराम महाराज यांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविती ।’ हा अभंग आठवला. माझ्याकडून ‘निसर्गदेवो भव ।’ हा नामजप आपोआप म्हटला जाऊन माझ्यात भावस्थिती निर्माण झाली.

१ आ. आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांच्या मूर्ती पाहून आलेल्या अनुभूती

१ आ १. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती : ‘रामनाथी आश्रमात प्रवेश करतांनाच प्रथम ऋद्धिसिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन झाले. ती मूर्ती पहाता क्षणी माझ्या मुखातून ‘गणेश स्तोत्र’ चालू झाले. माझ्या मनाला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा माझ्या मनात ‘प्रतिदिन या मूर्तीला प्रदक्षिणा घालाव्या’, असा विचार आला.

१ आ २. श्री भवानीदेवीची मूर्ती : आश्रमातील श्री भवानीदेवीची मूर्ती पाहून माझे मन भरून आले. श्री भवानीदेवी माझी कुलस्वामिनी आहे. तिचे दर्शन होताक्षणी माझा कंठ दाटून आला. मला इथेच तुळजापूरच्या श्री भवानीदेवीचे दर्शन झाले. ‘ती माझ्याकडे डोळे उघड-झाप करून पहात आहे’, असे मला वाटले. माझ्याकडून असंख्य चुका झाल्याने मी तिची क्षमायाचना करतांना मला पुन्हा तिचे डोळे हलतांना दिसले. ‘त्या मूर्तीमधील जिवंतपणा वाढला असून तिच्यात पुष्कळ चैतन्य आले आहे’, असे मला जाणवले. तिच्याकडे पहातांना माझे मन निर्विचार झाले. मला ‘मूर्तीकडे पहातच रहावे’, असे वाटले. माझ्यात पुष्कळ शरणागतभाव निर्माण होऊन मला कृतज्ञता वाटली.

१ इ. रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना उंबरठ्याला नमस्कार केल्यावर मला गारवा जाणवला.

१ ई. या वैकुंठभूमीला स्पर्श करतांना मला गुरुचरणांना स्पर्श केल्याची जाणीव झाली आणि माझे मन भावावस्थेत गेले.

१ उ. आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून आलेल्या अनुभूती

१ उ १. श्रीकृष्णाचे चित्र : उंबरठा ओलांडून आश्रमात प्रवेश करताच ‘स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्रातील श्रीकृष्ण माझ्याकडे पहात आहे. तो पुष्कळ आनंदी असून ‘त्याला मला काहीतरी सांगायचे आहे आणि मलाही त्याच्याशी बोलायचे आहे’, असा विचार माझ्या मनात आला. मला माझ्या अनाहतचक्रात गारवा जाणवला. श्रीकृष्णाचे चित्र हसरे आणि बोलके आहे. त्याला पाहून माझ्या मनाला एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवला.

१ उ २. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र : प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘ते सर्वांकडे पहात आनंदाचा वर्षाव करत आहेत’, असे मला जाणवले. ‘देवा, माझीही अशीच आनंदावस्था राहू दे’, अशी माझ्याकडून नकळत प्रार्थना झाली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातून गारवा येऊन मला शांतीची अनुभूती आली.

१ ऊ. मी आजारी असल्याने मला चालता येत नव्हते. तेव्हा ‘माझ्यामागून वार्‍याचा झोत येऊन तो मला चालवत आहे’, असे मला जाणवले.

२. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिराच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. ध्यानमंदिरात पाऊल ठेवताक्षणी तेथे पुष्कळ चैतन्य जाणवणे : ध्यानमंदिरात मला प्रचंड शांती, आपतत्त्व आणि तेजतत्त्व जाणवले. ध्यानमंदिरातील देवतांची चित्रे आणि गुरुपरंपरेची छायाचित्रे (श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद, श्री अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज (प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी) आणि शिष्य डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे) पहातांना माझा भाव दाटून आला. मला माझ्या शरिरात हलकेपणा जाणवला. ‘या शांतीमय वातावरणात जणूकाही ऋषिमुनीच (साधक) नामजपाला बसले आहेत’, असे मला जाणवले. त्यांची एकाग्रता पाहून माझ्याकडून श्री गुरूंप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) मनोमनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त झाली.

२ आ. मन अंतर्मुख होऊन ध्यानावस्था प्राप्त होणे : ध्यानमंदिरात बसताक्षणी क्षणभरात माझा नामजप एका लयीत चालू झाला. मनात क्षणभर नकारात्मक विचार आले, तरी लगेच जाणीव होऊन माझे मन अंतर्मुख होत होते.

२ इ. ध्यानमंदिराच्या भिंतीत थंडावा जाणवून तिचा स्पर्श मृदू अन् मुलायम लागणे आणि ‘त्या भिंतीत जिवंतपणा असून ती सतत नामजप करत आहे’, असे जाणवणे : ध्यानमंदिराच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाकडील भिंतीत मला थंडावा जाणवला. ती भिंत जिवंत असून तिला स्पर्श करताक्षणी तिची स्पंदने हाताला मऊ, मृदू आणि मुलायम लागली. तेव्हा निर्विचार अवस्था निर्माण होऊन माझे ध्यान लागले आणि ‘मी ऋषिमुनींच्या सान्निध्यात आहे’, असे मला जाणवले. मला तिथे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकू आला. तेव्हा ‘भिंत सतत नामजप करत आहे’, असे मला जाणवले.

३. आश्रमातील साधकांची जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, हे रामनाथी आश्रमातील साधकांचे वैशिष्ट्य आहे.

आ. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) छत्रछायेखाली रहाणार्‍या एवढ्या सर्व साधकांकडून नम्रता, बोलण्यातील गोडवा आणि आपलेपणा असे अनेक गुण मला शिकायला मिळाले.

इ. येथील साधकांमध्ये जेवढा प्रेमभाव आहे, तेवढीच त्यांच्यामध्ये शिस्तही आहे.

ई. साधक प्रत्येक वस्तू ठरलेल्या ठराविक जागेवर ठेवत असल्याने नवीन साधकाला शोधावे लागत नाही. त्यामुळे  कुणाचाही वेळ वाया जात नाही.

उ. साधकांनी फलकावर मोजक्या शब्दांत लिहिलेल्या चुकांतून त्यांच्या चुकांचे गांभीर्य समजते.

ऊ. येथे प्रत्येकात साधकात गुरुतत्त्व, गुरुनिष्ठा, परिपूर्ण सेवेची तळमळ आणि चुकांची खंत जाणवते.

येथील सर्व साधक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष चैतन्याच्या झोतात वावरत असतात. त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. प्रत्येकात गुरुरूप असल्याची जाणीव होते. ‘त्यांचे बोलणे, वागणे, नम्रपणा आणि सतत हसतमुख असणे’, हे पाहून क्षणभर आपण स्वतःला होत असलेला त्रास विसरतो. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हिरे वेचून त्यांना साधकत्वाच्या कोंदणात बसवले आहे’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव दाटून आला. श्री गुरु प्रत्येक साधकाला त्यांच्या चैतन्याच्या माध्यमातून शिकवून सिद्ध करत आहेत. त्यामुळे ‘रामनाथी आश्रमातील साधक आदर्श असतो’, याची माझ्या मनाला जाणीव झाली. ‘इतक्या लहान-मोठ्या साधकांना घडवणे, ही गुरुमाऊलीचीच कृपा आहे’, याची मला जाणीव झाली.

४. अन्नपूर्णाकक्षाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

अ. अन्नपूर्णकक्षात पाऊल ठेवताच तेथील स्वच्छतेमुळे येथे श्री गुरु आणि अन्नपूर्णामाता यांच्या चैतन्यलहरी जाणवून प्रसन्नता वाटली. येथील लादीही अतिशय तेजस्वी आणि चैतन्यमय बनली आहे. ‘स्वच्छता, शुद्धता आणि पवित्रता म्हणजे काय ?’, हे अन्नपूर्णाकक्षात आल्यावर लक्षात आले.

आ. अन्नपूर्णाकक्षातील अन्नपूर्णामातेच्या मूर्तीला नमस्कार करतांना माझे मन निर्विचार झाले. ‘त्या मूर्तीकडे पहात रहावे’ असे मला वाटले.

इ. येथे (अन्नपूर्णाकक्षात) अग्निनारायण आणि आपतत्त्व यांचे चैतन्य जाणवले. मधूनच शांत वातावरणात मला ‘श्री दुर्गादेवी’चा जप ऐकू आला.

ई. अन्नपूर्णाकक्षात नियमांचे काटेकोरपणे पालन होते. सगळ्या गोष्टी वेळेत, भावपूर्ण आणि परिपूर्णतेने केल्या जातात. येथे ‘काटकसर कशी करायची ?’, हे मला शिकायला मिळाले.

५. आश्रमात वायुदेवतेचे अस्तित्व जाणवून ‘वायुदेवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर हात जोडून उभी आहे’, असे जाणवणे

रामनाथी आश्रमातील सभागृहामध्ये असलेल्या एका खांबाला डोके लावले असता ‘माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवले. मला तिथे वायुतत्त्व जाणवून मनाला आल्हाददायक वाटले. ‘वायुदेवता संपूर्ण आश्रम आणि साधक यांची हवेच्या माध्यमातून शुद्धी करत आहे अन् वायुदेवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर हात जोडून उभी आहे’, असे मला जाणवले.

६. ‘श्री गुरूंच्या कृपाछत्राखाली राहून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यायचे आहे’,  याची आश्रमात पुनःपुन्हा जाणीव होणे

आश्रमात प्रत्येक २० मिनिटांनी होणार्‍या ‘कृतज्ञता आणि प्रार्थना’ यांच्या उद्घोषणेच्या माध्यमातून ‘प्रार्थना करून ईश्वराकडून बळ कसे घ्यायचे अन् साधनेतील अडथळे दूर कसे करायचे?’, हे मला शिकायला मिळाले. माझ्या मनाला ‘श्री गुरूंच्या कृपाछत्राखाली राहून मानवी जीवनाचे कल्याण करून घ्यायचे आहे’, याची पुनःपुन्हा जाणीव होत होती. गुरुमाऊली सर्व साधकांकडून ऋषींप्रमाणे अपेक्षाविरहित राहून सेवा करवून घेऊन त्यांना आनंदी ठेवते.

७. रामनाथी आश्रम पाहिल्यावर ‘हेच ते श्रीविष्णूचे भूवैकुंठ !’ याची प्रचीती येणे

आश्रम पाहिल्यावर ‘इथे मानवाची बुद्धी चालत नाही. इथे बुद्धीवाद्यांची बुद्धी खुंटते. इथे सगळ्या देवतांचे अस्तित्व असून त्यांच्या कृपाछत्राखाली हा आश्रम चालतो’, याची माझ्या मनाला जाणीव झाली. ‘इथे ऋद्धिसिद्धिच नांदत आहेत’, हे सत्य आहे. हे पाहून ‘हेच ते श्रीविष्णूचे भूवैकुंठ !’, याची मला अनुभूती आली. रामनाथी आश्रम पाहिल्यावर क्षणोक्षणी  ‘श्रीमन्नारायणाच्या दरबारी अष्टसिद्धी नांदत आहेत’, याची अनुभूती येते. ‘हे अतिशय शांतीचे स्थान आहे’, असे मला जाणवले.

आश्रमातील आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. वर्णन करू तेवढे थोडेच आहे. ‘हे भगवंता, तूच आम्हा सर्व साधकांचा उद्धार कर’, अशी तुझ्या पावन श्रीचरणी आम्हा सर्व साधकांची प्रार्थना आहे. ’

– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश. (७.२.२०२२)