श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराडच्या तहसीलदारांना निवेदन
वाईनविक्रीच्या निर्णयाने महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ होईल !
कराड, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्य सरकारने घेतलेला वाईन विक्रीविषयीचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि समाजविघातक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ होईल. त्यामुळे तातडीने हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कराडचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सागर आमले, केदार डोईफोडे, नीलेश पवार, गणेश कापसे, धनंजय गुरव आणि २० हून अधिक धारकरी उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे,
१. सरकारच्या वाईनविक्री धोरणामुळे राज्याच्या जनजीवनावर विपरित परिणाम होणार आहे. महसूल वाढीचे गोंडस कारण पुढे करत महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा घाट घातला जात आहे.
२. राज्यात एका बाजूला महिला उभी बाटली आडवी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र सरकार लहानपणापासूनच मद्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकीकडे मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळेत मूल्यशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत, तेथेच आता किराणा दुकानातून आणि मॉलमध्ये वाईन उपलब्ध करून दिल्याने मुलांना व्यसनाधीन बनवण्याचा कुटील डाव सरकार रचत आहे.
३. शेतकर्यांच्या नावाखाली मोठे राजकारणी वाईन प्रकल्पाद्वारे स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. राज्य सरकारने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल.