बांदा, पानवळ येथील प.पू. दास महाराज यांच्या ‘गौतमारण्य’ आश्रमाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

‘२०.१२.२०२१ या दिवशी ‘गौतमारण्य’ आश्रम, बांदा, पानवळ येथे प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाला. त्या निमित्ताने मला तेथे जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी देवाच्या कृपेमुळे गौतमारण्य आश्रमाची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये माझ्या लक्षात आली. ती पुढे दिली आहेत.

श्री. राम होनप

१. गौतमारण्य आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतांना दैवी ऊर्जेची अनुभूती येण्यास प्रारंभ होतो. ‘प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी दीर्घकाळ केलेल्या साधनेचा हा परिणाम आहे’, असे मला जाणवले.

२. आश्रमाच्या परिसरात एक विहीर आहे. त्यात मी डोकावून पाहिले असता ज्याप्रमाणे एखाद्या अनोळखी घरात डोकावून पाहिल्यावर अकस्मात् समोर एखादी व्यक्ती दिसावी, त्याप्रमाणे मला त्या विहिरीत सूक्ष्मातून एक पुरुष देव आशीर्वादाच्या मुद्रेत दिसला. त्याकडे पाहून, ‘या देवाचे नाव काय ?’, असा मला प्रश्न पडला, तेव्हा ‘ही जलदेवता आहे’, असे मला सूक्ष्मातून उत्तर मिळाले. ‘त्या विहिरीत जलदेवतेचा वास आहे आणि त्यामुळे आश्रमाला पाणी कधी न्यून पडणार नाही’, असे मला जाणवले.

३. गौतमारण्य आश्रमाच्या परिसरात श्रीराम मंदिर आहे. श्रीरामाच्या मूर्तीकडे पाहून ‘तिच्या डोळ्यांची हालचाल होत असल्याचे जाणवणे, तिची कर्णकुंडले हलतांना दिसणे आणि ‘श्रीराम आपल्याशी काहीतरी बोलणार आहे’ इतकी ती सजीव असल्याचे जाणवणे’ या अनुभूती मला आल्या.

४. आश्रमात देवघर आहे. तेथे देवतांच्या मूर्तींच्या समवेत प.पू. दास महाराज यांचे गुरु प.प. श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका आहेत. देवघरात प्रवेश केल्यावर ‘आपण एखाद्या दैवी लोकात प्रवेश केला आहे’, असे मला जाणवले आणि देवघरातील पुष्कळ चैतन्याने माझे मन निर्विचार झाले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक