नगर अर्बन बँकेमध्ये १५० कोटी रुपयांचा अपव्यवहार !
दिवसेंदिवस बँकांमधील उघड होणारे कोट्यवधी रुपयांचे अपहार राष्ट्रासाठी घातक आहेत. भ्रष्टाचार्यांना कठोर शिक्षा हाच यावरील उपाय आहे. दोषींना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाईच करायला हवी. – संपादक
नगर – वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत नगर अर्बन बँकेचे संचालक आणि अधिकारी यांनी खातेदार अन् सभासद यांचा विश्वासघात करून १५० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. (यामुळे बँकांवरील विश्वास उडाला आहे. – संपादक) बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या तक्रारीवरून तत्कालीन अध्यक्ष, संचालक, सदस्य, कर्जदार, बँकेचे अधिकारी आणि मुख्य शाखेचे व्यवस्थापक आदींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. नगर अर्बन बँकेच्या मुख्य शाखा आणि इतर कार्यालये यांमध्ये झालेल्या अपव्यवहारामुळे सभासदांना लाभांश अन् ठेवीदारांना परतावा, ठेवीची रक्कम आणि इतर खात्यांमधील रक्कमा परत मिळत नाहीत. गांधी यांनी या प्रकरणी वेळोवेळी पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती, तसेच संभाजीनगर खंडपिठात याचिका नोंद करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठीही पोलीस अधीक्षकांना आदेश देण्याची मागणी केली होती.
आतापर्यंतच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाअन्वये अनेक अपव्यवहार समोर आले आहेत. विविध प्रकारची नियमबाह्य आणि बनावट कर्ज प्रकरणे, तसेच सोनेतारण व्यवहारात बँकेची एकूण १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे गांधी यांनी तक्रारीत म्हटले आहे.