शाळेचे नियम पटत नसतील, तर मदरशांत प्रवेश घ्यावा ! – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप
नागपूर – प्रत्येक शिक्षणसंस्था आणि शाळा यांचे नियम असतात. त्यांचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. तिथे धार्मिक कट्टरता आणण्याची आवश्यकता नाही. शाळेचे नियम पटत नसतील, तर मुसलमान मुलींनी मदरशांत प्रवेश घ्यावा, अशी भूमिका विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी येथे एका दैनिकाशी बोलतांना मांडली. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलतांना परांडे यांनी हिंदुविरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.
जाणीवपूर्वक बळजोरी चालणार नाही !
परांडे पुढे म्हणाले की, हिजाब धर्माला आवश्यकच आहे, तर आतापर्यंत मुसलमान महिला हिजाब घालत नव्हत्या. त्या काय धर्मविरोधी आचरण करत होत्या का ? जाणीवपूर्वक वादग्रस्त सूत्रे उपस्थित करून हिंदूंची अपकीर्ती करण्याचे हिंदु विरोधकांचे मनसुबे हिंदु समाज उधळून लावेल. हिजाब हा काही धर्माच्या परंपरेविषयीचा आग्रह अजिबात नाही. हिंदुविरोधी शक्ती हिंदूंना अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाणीवपूर्वक बळजोरी करत असाल, तर चालणार नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली.
कायदा हातात घेणार्यांना धडा शिकवा !
ते म्हणाले की, नेमक्या निवडणुका आल्या की, असे धार्मिक विषय का येतात ? यांतून धार्मिक ध्रुवीकरण केले जाते, असा सूर सामाजिक माध्यमांवरील चर्चेत व्यक्त केला जात आहे. सूर व्यक्त करणार्यांचा रोख भाजप आणि संघ परिवार यांच्याकडे असतो; पण हिजाबचा वाद भाजप वा संघाने उकरून काढलेला नाही. तो कुणी चालू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. देशभरात हिंदुविरोधी वातावरण सिद्ध करायचे आणि वरून हिंदूंनाच दोष द्यायचा, असा उलटा कारभार चालू आहे. हिंदु समाजाकडून याला विरोध झाला पाहिजे, तसा तो होतही आहे. कायदा हातात घेणार्यांना धडा शिकवला पाहिजे.