प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन विधी सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती
प.पू. दास महाराज यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने त्यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार !
उद्या माघ कृष्ण पक्ष सप्तमी (२३.२.२०२२) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग येथे २०.१२.२०२१ या दिवशी झालेल्या त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांच्या दर्शनाने प्रवासाचा शीण निघून जाणे
‘प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी मी कराडहून बांदा येथे आले होते. इतका लांबचा प्रवास केल्याने मला थकवा आला होता; पण गौतमारण्य आश्रमात पोचल्यावर प.पू. बाबा (प.पू. दास महाराज) आणि पू. (सौ.) माई (पू. (सौ.) लक्ष्मी नाईक, प.पू. दास महाराज यांच्या पत्नी) यांच्या दर्शनाने थकवा निघून गेला. आश्रमातील अन्य साधकांशी बोलल्यानंतर मला ‘आध्यात्मिक उन्नती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ?’, याची जाणीव झाली. ‘यज्ञाच्या आरंभापासून शेवटपर्यंत माझ्या शरिरातील वाईट शक्ती बाहेर पडत आहेत’, असे मला जाणवत होते. मला सतत झोप येत होती आणि चैतन्यही अनुभवता येत होते.’
– सौ. प्रतिभा नितीन गुजर, कराड
२. प.पू. दास महाराज मार्गदर्शन करतांना ‘ते म्हणजे श्रीकृष्णाचा संदेश घेऊन आलेला दूत आहे’, असे वाटणे
‘सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प.पू. दास महाराज म्हणाले, ‘‘हिंदु धर्मावर चारही बाजूंनी आघात होत आहेत; म्हणून हिंदूंनी धर्मासाठी प्रतिदिन एक घंटा वेळ द्यायला हवा.’’ त्या वेळी ‘प.पू. दास महाराज म्हणजे श्रीकृष्णाने संदेश देऊन पाठवलेला दूत आहे’, असे मला वाटले. या प्रसंगी माझ्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष राधाकृष्ण अवतरल्याचे मला जाणवले.’
– एक साधक
३. सोहळ्यात कधी न अनुभवलेला दैवी सुगंध जाणवणे
‘या सोहळ्यातून प्रक्षेपित होणारे चैतन्य माझ्या मस्तकातून देहात जात आहे’, असे मला जाणवले. अधूनमधून मला वेगळाच सुगंध येत होता. असा सुगंध यापूर्वी मी कधीच अनुभवला नव्हता. या सोहळ्यात माझा भाव जागृत होत होता आणि मला थंडावा जाणवत होता.’
– श्रीमती सरिता सुरेंद्र प्रभु, आजगाव, जि. सिंधुदुर्ग
४. ‘संपूर्ण सोहळ्याच्या वेळी मला चैतन्य जाणवत होते. यज्ञाच्या वेळी माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवत होती.’
– सौ. अंजली अरगडे, गोवा.
५. ‘मंत्रोच्चार चालू असतांना ‘ऋषीमुनी सोहळ्यात उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. संजय नाणोसकर
६. ‘पूर्णाहुती दिल्यानंतर वातावरणात थंडावा जाणवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते.
– सौ. अनिता वारखंडकर, सौ. मीनाक्षी टेमकर, शुभांगी नाईक आणि सौ. स्वाती मसुरकर
७. सर्वत्र गुलाबी आणि पिवळ्या रंगांचे किरण दिसणे
‘कार्यक्रमाच्या वेळेला वातावरण आल्हाददायक आणि चैतन्यमय होते. माझी भावजागृती झाली. मंत्रोच्चाराच्या वेळी डोळे मिटल्यावर मला सर्वत्र गुलाबी आणि पिवळ्या रंगांचे किरण दिसले.’
– सौ. निलम नितीन खानोलकर
८. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि मारुतिराय यांचे दर्शन होणे
‘सोहळ्यात माझा सात्त्विक भाव जागृत झाला. प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर आणि मारुतिराय यांचे दर्शन झाले. माझ्या मनातील विचार एकदम थांबून मन निर्विचार झाले. ‘कार्यक्रमात देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला वाटले.’
– श्री. आणि सौ. वैद्य, गोवा.
९. सहस्र रुद्र दिसणे
‘या सोहळ्यामध्ये मला आनंद जाणवला. ‘सहस्र रुद्र हातात त्रिशूळ घेऊन उपस्थित आहेत’, असे मला दिसले. ‘हनुमंताने त्या सर्वांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पाठवले आहे’, असे मला जाणवले.’
– श्री. रामप्रसाद कुष्टे
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेले साधक पाहून पुष्कळ आनंद आणि प्रसन्नता जाणवणे
‘या संपूर्ण सोहळ्यात मी शिस्त अनुभवली. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली शिकवण आणि केलेले संस्कार यांतून साधक कसे घडले ?’, हे पाहून मला भरून आले. त्यामुळे मला प्रसन्नता वाटली आणि आनंद मिळाला. मला सोहळ्यात देवतांचे अस्तित्व जाणवले. परात्पर गुरु डॉक्टर, प्रभु श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांचे अखंड चैतन्य सोहळ्यात जाणवत होते.’
– सौ. शुभांगी कंग्राळकर, बेळगाव (कर्नाटक)
११. ‘प.पू. दास महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी चालू असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचाच सोहळा होत आहे’, असे जाणवून कृतज्ञताभाव जागृत होणे
‘रात्री प.पू. दास महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी चालू असतांना ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्यासाठीच पुष्पवृष्टी चालू आहे आणि त्यांचे शिष्य डॉ. आठवले पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले. त्यानंतर मला ‘साक्षात् प.पू. गुरुमाऊलीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सोहळा होत आहे’, असे जाणवून कृतज्ञताभाव सतत अनुभवता आला.
११ अ. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती जाणवलेला कृतज्ञताभाव !
११ अ १. प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी भरभरून बोलणे, त्यामुळे सतत भावजागृती होणे : सोहळ्याला येण्यासाठी जागरण आणि लांबचा प्रवास होऊनही प्रवासानंतर स्वच्छता अन् स्वयंपाक यांसारख्या शारीरिक सेवा करतांनाही मला थकवा जाणवला नाही. सतत ३ दिवस माझी अखंड सेवा चालू होती, तरी मला उत्साह आणि चैतन्य जाणवत होते. या ३ दिवसांच्या कालावधीत प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई हे प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते आणि त्यांच्याविषयी भरभरून बोलत होते. तेव्हा माझा भाव सतत जागृत होत होता.
११ अ २. सोहळा संपल्यावर परत जाण्यासाठी निघतांना ‘प.पू. दास महाराज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलत असतांना ते ऐकतच रहावे, तिथून बाहेर पडू नये’, असे वाटणे : आम्ही बरेच साधक बाहेरगावी जाण्यासाठी निघतांना प.पू. दास महाराज यांना भेटण्यासाठी जाऊन नमस्कार करत होतो. तेव्हा प.पू. दास महाराज परात्पर गुरु डॉक्टरांविषयी भरभरून बोलायचे. आम्हीही पुढे आणखी काहीतरी ऐकायला मिळेल; म्हणून थांबायचो. ‘तिथून निघायलाच नको’, असे आम्हाला वाटायचे. आम्हाला प.पू. बाबा आणि पू. (सौ.) माई यांच्यातील दास्यभाव आणि कृतज्ञताभाव सतत अनुभवता आला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या आशीर्वादाने या ऐतिहासिक दैवी सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली, याविषयी कृतज्ञता !’
– सौ. मीरा मदन सावंत, कराड
(सर्व सूत्रांचा दिनांक : १७.१.२०२२)
|