अंनिस, पुरोगामी आणि हिंदुद्वेषी पत्रकार यांना चर्चासत्रात बोलावून सनातन संस्थेला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न !
सनातन संस्थेवरील बंदीसाठी ‘मॅक्स महाराष्ट्र’ या ‘वेब पोर्टल’ची ‘मिडिया ट्रायल’
मुंबई – पुरोगाम्यांच्या हत्येची प्रकरणे न्यायप्रविष्ट असतांना ११ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘मॅक्स महाराष्ट्र’ या वेब पोर्टलवर (वृत्तसंकेतस्थळावर) सनातन संस्थेवरील बंदीसाठी ‘मिडिया ट्रायल’ म्हणून ‘आतातरी सनातन संस्थेवर बंदी येणार का ?’, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये पत्रकार अलका धुपकर, अंनिसचे माधव बागवे, मिलिंद देशमुख आणि आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे या पुरोगामी अन् हिंदुद्वेषी मंडळींना निमंत्रित करून सनातन संस्थेला गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (एका आध्यात्मिक संस्थेला गुन्हेगार ठरवण्यासाठी उठाठेव करणार्यांनी कधी देशाला ग्रासलेल्या जिहादी आतंकवादावर चर्चासत्र घेतले आहे का ? सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रामाणिकपणे प्रसार करत असल्यामुळेच हिंदुद्वेषी मंडळींना पोटशूळ झाला आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)
(म्हणे) ‘सनातनसारख्या संस्था धर्माच्या आधाराने दंगली, बाँबस्फोट करत असतील, तर हे गंभीर !’ – धनंजय शिंदे, आम आदमी पक्ष
मागील ७-८ वर्षांमध्ये पुरोगाम्यांच्या हत्या घडल्या. त्यांची पाळेमुळे सनातन संस्थेच्या पदाधिकार्यांपर्यंत जात असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) अन्वेषणातून सिद्ध झाले आहे. त्यांचा सहभाग सिद्ध झाला, तर त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. (पुरोगाम्यांच्या हत्येमध्ये सनातन संस्थेला विनाकारण अडकवण्यात येत असल्याची भूमिका संस्थेने स्पष्ट केली आहे. याविषयी संस्थेकडून अन्वेषण यंत्रणेला वेळोवेळी सहकार्यही करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता एखाद्याला दोषी ठरवणे, हा ‘मिडिया ट्रायल’ चा प्रकार होय ! – संपादक) अशा संस्था सामाजिक कार्यामध्ये हिंसक वृत्तीसाठी धर्माचा आधार घेत तरुणांना फसवत असतील, नियोजन करून दंगली, बाँबस्फोट, हत्या करत असतील, तर ही गंभीर गोष्ट आहे. सरकारने त्यांच्यावर बंधन ठेवले पाहिजे. राज्यघटना असतांना ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना मांडणे, ही उथळ गोष्ट आहे. हे कधीच मान्य होऊ शकत नाही. (ज्याप्रमाणे राज्यघटनेत पालट करून भारत धर्मनिरपेक्ष होऊ शकतो, तर आणखी एक पालट करून भारत ‘हिंदु राष्ट्र’ ही होऊ शकतो ! – संपादक) दाभोलकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी मोकाट सुटले असतील, तर त्यांच्यावर बंधने आली पाहिजेत. मानसिकदृष्ट्या कमकुवत लोकांना संमोहित करून त्यांचा वापर केला जातो. धर्मांचे भांडवल करणारे विशेषत: हिंदु धर्माच्या नावावर चालणारे राजकीय पक्ष स्वत:ची ‘व्होट बँक’ (मतपेढी) धोक्यात येईल, म्हणून कारवाई करत नाहीत. पोलिसांनी ठरवले, तर धर्माच्या नावावर धंदा करणार्या अशा ‘बांडगूळ संस्था’ आणि त्यांचे पदाधिकारी यांना सरळ करण्यास वेळ लागणार नाही; परंतु दुर्दैवाने सरकार ते करत नाही. (यातूनच धनंजय शिंदे आणि आम आदमी पक्ष यांची भाषाशैली किती खालच्या दर्जाची आहे, हे कळते ! – संपादक) त्यातून हकनाक पुरोगामी विचारवंतांची हत्या केली जात आहे.
(म्हणे) हिंदु धर्माचे नाव घेऊन सनातन संस्था हिंसक कृत्ये करते ! – अलका धुपकर, पत्रकार
आतंकवादाला रंग नसतो. तो केवळ आतंकवाद असतो. एका समाजाला सातत्याने ‘आतंकवादी’ असा शिक्का लावण्यात येत आहे. (तथाकथित ‘भगवा आतंकवाद’ असा शब्द प्रयोग करून हिंदूंची अपकीर्ती करायची; मात्र जिहादी आतंकवादाने देशाला ग्रासले असतांना ती वस्तूस्थिती लपवायची, हा अल्पसंख्यांकधार्जिणेपणा होय ! – संपादक) ‘हिंदु राष्ट्र’ बनवणे, हे सनातनचे धेय्य आहे. त्यांना राज्यघटना, महात्मा गांधी, धर्मनिरपेक्ष व्यवस्था मान्य नाही. (धर्मनिरपेक्ष व्यवस्थेमुळेच देशाची अशी स्थिती झाली आहे. यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात यावे, ही सनातनची भूमिका स्पष्ट आहे. त्यामध्ये लपवण्यासारखे काही नाही ! – संपादक) विक्रम भावे शिक्षा भोगून बाहेर आल्यावर त्यांनी दाभोलकर यांच्या हत्येची रेकी केली. हत्या करणार्यांना त्यांनी सर्वाेतोपरी साहाय्य केले. ही कसली देशभक्ती आहे ? ‘अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे दाभोलकर यांच्या हत्येतील सहआरोपी आहेत’, हे महाराष्ट्राला पुन:पुन्हा सांगितले पाहिजे. एका पत्रकार परिषदेत पुनाळेकर हे सांगत होते की, विक्रम भावे आणि ५ आरोपी हे माझ्या संपर्कात आहेत; मात्र या देशातील न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. सनातन संस्थेने जाहीर करावे की, ज्या ५ आरोपींवर ‘रेड कॉर्नर’ नोटीस आहे ते पुढे का येत नाहीत ? संस्थेचे नालासोपारा येथील कार्यकर्ते वैभव राऊत यांच्या घरात जी स्फोटके सापडली यातून सनातन संस्थेचे खरे रूप बाहेर आले आहे. या संस्थेला स्फोटकांची, रायफलचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता काय ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. ‘धर्मसेवा आणि साधना यांसाठी एखाद्याची हत्या करणे आम्ही मान्य करतो’, असा समज करून हिंसेसाठी हिंदु धर्माचा वापर केला जात आहे. (वैभव राऊत हे हिंदू गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ते आहेत. सनातन संस्थेकडून कधीही स्फोटक किंवा रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. धांदात खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करणारे असे पत्रकार समाजाचे हित काय साधणार ? – संपादक) सनातन संस्था त्याचा प्रचार-प्रसार करते, हे देशाचे दुर्दैव आहे. धर्मावर श्रद्धा ठेवणार्या हिंदूंना फसवण्याचे ते कार्य करत आहेत. हिंदु धर्माचे नाव घेऊन सनातन संस्था हिंसक कृत्ये करत आहे. (सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था असून हिंदु धर्माच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. सनातन संस्थेने कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही. केवळ पुरोगाम्यांच्या हिंदु धर्माच्या विरोधातील विचारांचा वैचारिक प्रतिवाद केला आहे ! – संपादक)
देशसेवा करणार्या संघटनेचे प्रमुख आठवले आहेत कुठे ? ते बाहेर का येत नाहीत. ते गुप्तपणे का जगत आहेत ? याचे उत्तर सनातन संस्थेने द्यावे. सनातनचे साधक मलगोंडा पाटील, योगेश नाईक यांच्या खोलीमध्ये आपेक्षार्ह लिखाण सापडले होते. ते आठवले यांच्या खोली शेजारीच रहात होते. त्यांना भडकावून त्यांचे ‘ब्रेन वॉश’ केले होते. अन्वेषण यंत्रणांच्या त्रुटीचा अपलाभ घेत ही सनातन संस्था इथपर्यंत पोचली आहे. या त्रुटींमुळे या अन्वेषण यंत्रणा हरल्या आहेत. सनातन संस्थेवर गोवा येथे मोठा राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे सनातनवर कारवाई होत नाही. सनातन संस्थेच्या सर्व आश्रमांवर धर्मादाय खात्याच्या अंतर्गत चौकशी लावावी. (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे बाहेर फिरत नाहीत. याविषयी माहिती न घेता व्यक्तीगत टीका करणार्या धुपकर यांचा यातून सनातनद्वेष दिसून येतो. – संपादक)
(म्हणे) धर्म आणि जात यांच्या आडून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून हिंसक तत्त्वज्ञान दिले जाते ! – माधव बागवे, अंनिस
धर्म आणि जात यांच्या आडून ‘सनातन प्रभात’ या दैनिकातून हिंसक तत्त्वज्ञान दिले जाते. ‘दुर्जनांना मारल्यानंतर आनंद वाटेल’, ‘हिंदू नक्षलवादी व्हा’, ‘धर्मद्रोही नेत्यांना नष्ट करा’, ‘पोलिसांविरोधात कृती करा’ असे सांगण्यात येते. तरुण मुला-मुलींना कुटुंबापासून तोडून धर्माच्या नावावर एकत्र केले जाते. त्यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. ‘धर्मासाठी जीव गेला, तर मोक्ष मिळेल’, अशी शिकवण दिली जाते. त्यांना स्वप्नरंजनामध्ये ठेवतात. समाजाला शहाणपण देणारी माणसे त्यांना नको आहेत. (दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून कधीही हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही. ‘सनातन प्रभात’मधून हिंदु धर्मावरील अन्यायाच्या विरोधात सडेतोड लिखाण केले जाते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये अंनिसमधील आर्थिक अपहार, तसेच अंनिसचे हिंदु धर्माच्या विरोधातील खरे स्वरूप उघड केले आहे. यामुळेच बागवे अशी गरळओक करत आहेत ! – संपादक) आता पूर्वीसारखी गावंढळ बुवाबाजी सोडून नव्या पद्धतीने आध्यात्मिक बुवाबाजी वाढत आहे. त्यातून तरुणांना कट्टर धार्मिक केले जाते. (सनातनचे साधक राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी, तसेच समाज साधनेला लागावा यासाठी कार्य करतात. अनेक साधक सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन साधना करतात. साधना, त्याग यांविषयी गंध नसलेल्या अंनिसवाल्यांना हे काय कळणार ? – संपादक) एकदा का तरुण आश्रमामध्ये गेला की, तेथून त्याला बाहेर पडण्यास मार्ग नसतो. (धादांत खोटी माहिती देऊन जावईशोध लावणारे बागवे ! – संपादक) अन्वेषण यंत्रणा आणि राजकारणी यांनी कडक भूमिका घेतली असती, मडगाव बाँबस्फोटातील आरोपींना पकडले असते, तर पुढील हत्या झाल्या नसत्या.
(म्हणे) दैनिक ‘सनातन प्रभात’ मधून जनतेला भडकावणारे लिखाण प्रसिद्ध केले जाते ! – मिलिंद देशमुख, अंनिस
जनतेला भडकावणे फारच सोपे असते. तशा पद्धतीचे लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध केले जाते. सभा उधळण्यापासून ते बाँबस्फोट करण्यापर्यंतचे लिखाण केले आहे. तसे प्रशिक्षण दिले जाते. दाभोलकर यांची हत्या करतांना पाठीमागून छुप्या पद्धतीने गोळ्या झाडल्या. पानसरे यांना मारतांना धाडसाने समोरून गोळ्या मारल्या. कलबुर्गी यांना तर घरात घुसून मारले. अशा पद्धतीने त्यांचे धाडस वाढत चालले आहे. हे हिंदु धर्माच्या विरोधातील लोक असल्याचे सांगून त्यांना मारून ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करावे लागेल, असे तरुणांच्या मनावर बिंबवले जात आहे. तरुणांना हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एकत्र केले जाते. सर्वच राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी अशा संस्थांच्या विरोधात जात नाहीत. (पुरोगाम्यांच्या हत्येची प्रकरणे न्यायप्रविष्ट असतांनाही एखाद्याला गुन्हेगार ठरवणे, हे राज्यघटनेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ? यातून अंनिसचा भंपकपणा दिसून येतो ! – संपादक)