कुडाळ शहरात ‘अफझलखान वधा’चा ‘बॅनर’ लावल्यामुळे ‘सिद्धीविनायक ग्रुप’ला पोलिसांची नोटीस
हिंदु संघटनेला पोलिसांची नोटीस
‘देशावर चालून आलेल्या शत्रूला कसे संपवायचे’, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून इतिहास रचला. खरा इतिहासच दाखवण्यास पोलीस आक्षेप घेऊ लागले, तर पुढील पिढीला खरा इतिहास समजणार कसा ? – संपादक
कुडाळ – १९ फेब्रुवारी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. उत्सवाच्या वेळी कुडाळ शहरातील कॉलेज चौक येथे ‘सिद्धीविनायक ग्रुप’ या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा वध करतांनाचा ‘बॅनर’ (फलक) लावला होता. ‘या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणताही दखलपात्र किंवा अदखलपात्र अपराध घडल्यास आपणास उत्तरदायी धरून आपल्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, अशी नोटीस कुडाळ पोलिसांनी ‘सिद्धीविनायक ग्रुप’चे अमित राणे यांना पाठवली. (खरा इतिहास दाखवल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा ? हा भारत आहे कि पाकिस्तान ? – संपादक)
या नोटिसीत म्हटले आहे की, १९ फेब्रुवारी या दिवशी प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आपल्याकडून मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकाराच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता १९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने आणि स्वत:च्या अन् इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरा करण्याविषयी महाराष्ट्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ‘सिद्धीविनायक ग्रुप’च्या वतीने कॉलेज चौक, कुडाळ येथे अफझलखान वधाच्या लावलेल्या बॅनरमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. (‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणजे ‘सज्जनांचे रक्षण आणि वाईटाचा नाश’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना ‘कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये’, यासाठी पोलिसांनीच प्रयत्न करायला हवेत ! – संपादक)