५८ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील कु. अर्चिता मधुसूदन सोन्ना (वय ११ वर्षे) !
माघ कृष्ण पक्ष षष्ठी (२२.२.२०२२) या दिवशी कु. अर्चिता सोन्ना हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. अर्चिता सोन्ना हिला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
(‘वर्ष २०१८ मध्ये कु. अर्चिता सोन्ना हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के होती.’ – संकलक)
(‘अर्चिता’ या नावाचा अर्थ – जिची अर्चना केली जाते किंवा जी पूजनीय आहे, अशी)
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. अर्चिता सोन्ना उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५८ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. आनंदी आणि उत्साही : ‘अर्चिता नेहमी आनंदी असते. तिला घरातील कुणी रागावले, तरीही ती त्याचा स्वतःवर परिणाम करून घेत नाही. ती कधीही हट्ट करत नाही. आम्हाला कधीही तिची समजूत काढावी लागली नाही. ती सण, घरगुती कार्यक्रम, पूजेची सिद्धता, या वेळी अत्यंत उत्साहाने सहभागी होते. तिचा उत्साह पाहून आम्हालाही उत्साह येतो.
२. धर्माभिमानी : ती प्रतिदिन कुंकू लावते आणि हातात बांगड्या घालते. तिला त्याचा अभिमानही आहे. वसाहतीतील अन्य महिला मला सांगतात, ‘‘अर्चिता किती छान कुंकू लावून दोन वेण्या घालते. सध्या असे कुणीही करत नाही.’’ एकदा तिच्या मैत्रिणीने तिला म्हटले, ‘‘तू काकूबाईप्रमाणे कुंकू आणि बांगड्या घालतेस.’’ तेव्हा तिने मैत्रिणीला सांगितले ‘‘आपण हिंदु आहोत. आपण हातात बांगड्या घातल्या पाहिजेत आणि कुंकूही लावले पाहिजे.’’
३. घरकामांत साहाय्य करणे
अ. एप्रिल २०२० मध्ये दळणवळण बंदीच्या काळात माझ्या सासूबाई (वय ७९ वर्षे) रुग्णाईत होत्या. त्यांचे वयोमानामुळे सर्वकाही जागेवरच करावे लागे. तेव्हा कामवाली बाईही घरी काम करायला येऊ शकत नव्हती. त्या वेळी अर्चिताने ५ – ६ दिवस पुष्कळ भांडी घासली.
आ. ती मला स्वयंपाक बनवण्यात साहाय्य करते. मी घरी नसतांना ती घरातील सदस्यांना चहा करून देते. एखादा खाऊही बनवून देते.
४. सतर्कता : ‘घरात अनावश्यक दिवे चालू नाहीत ना किंवा पाणी गळत नाही ना ?’, याकडे तिचे लक्ष असते. घरातून बाहेर जातांनाही ती विजेची बटणे बंद केली असल्याची निश्चिती करते.
५. सहनशील
अ. वर्ष २०१८ मध्ये अर्चिता ८ वर्षांची असतांना तिच्या दोन दाढांचे ‘रूट कॅनल’ करावे लागले. त्याच वर्षी तिचे दोन दुधाचे दातही (पहिले आलेले दात) पडले; पण नवीन दात बाहेर येत नव्हते. त्यासाठी तिची हिरडी कापून लहानसे शस्त्रकर्म करावे लागले. तिने हे उपचार धिराने करवून घेतले. ती रुग्णालयात जातांना ‘प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो, भगवान श्रीकृष्णाचा विजय असो’, असा जयघोष करत असे.
आ. मार्च २०२१ मध्ये तिच्या गुडघ्यांची आतील बाजूने वाढ झाल्याने तिच्या पायाच्या आकारात पालट झाला होता. त्यामुळे तिला चालतांना आणि पायर्या चढ-उतार करतांना त्रास होत होता. एका आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तिचे शस्त्रकर्म करावे लागेल.’’ दुसर्या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘स्टील रॉड कॅप’ लावण्याचे उपचार केल्यावर शस्त्रकर्म करावे लागणार नाही.’’ त्या वेळी ‘शस्त्रकर्म झाले, तर आई-वडिलांना माझे सर्वकाही करावे लागेल’, असा तिचा विचार करून ती दुसर्या आधुनिक वैद्यांनी सांगितलेले उपचार करून घेण्यास सिद्ध झाली. अर्चितावर अजूनही ते उपचार चालू आहेत. त्यासाठी तिला १६ ते १७ घंटे पायाला तो बेल्ट लावायला लागतो. तिने संतांनी सांगितलेला नामजपही भावपूर्ण केला. आता गुरुकृपेने तिच्या गुडघ्यात सुधारणा आहे.
६. समंजस : तिला मैत्रिणींशी खेळायला पुष्कळ आवडते; परंतु दळणवळण बंदीच्या काळात तिने एकदाही मैत्रिणींच्या समवेत खेळण्याचा हट्ट केला नाही. ती घरात खेळतांना वाटायचे की, ती गोपींसह खेळत असून भावविश्वात रमली आहे.
७. सेवेची आवड-नावड नसणे : वर्ष २०१८ मध्ये चिंचवड येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी ती माझ्यासह प्रथमोपचार कक्षात सेवेला होती. त्या वेळी तिचे वय ८ वर्षे होते. तिच्या सर्व साधक मैत्रिणी बालकक्षात सेवेत होत्या. तेव्हा माझ्या मनात ‘तिला बालकक्षात सेवा मिळाली असती, तर बरे झाले असते’, हा विचार आला. मी तिला तसे सांगितल्यावर तिने मला सांगितले, ‘‘कुठेही सेवा केली, तरी ती गुरुदेवांचीच सेवा आहे.’’
८. रामनाथी आश्रमात असतांना सहजतेने वागणे
८ अ. वर्ष २०१९ मध्ये आम्ही रामनाथी आश्रमात गेल्यानंतर तिने साधकांशी ओळख करून घेतली. तेव्हा ती आश्रमातीलच असल्याप्रमाणे वावरत होती.
८ आ. संतांनी सांगितल्याप्रमाणे भावपूर्ण नामजप करणे : रामनाथी आश्रमात असतांना एकदा तिने संतांना विचारले, ‘‘मी नामजपाला बसल्यावर मित्र-मैत्रिणी मला सारखे खेळायला बोलावतात. त्यामुळे माझा नामजप होत नाही. मी कसा प्रयत्न करू ?’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘आईचे साहाय्य घेत जा. प्रार्थना करून नामजप कर.’’ वर्ष २०२१ मध्ये सद्गुरु सत्यवान कदम यांनी तीव्र गुडघेदुखीसाठी दिलेला नामजप करतांना तिला याचा लाभ झाला. ती २ मास प्रतिदिन ३ घंटे प्रार्थना करून भावपूर्ण नामजप करत असे.
९. देवतांप्रती भाव
अ. ती श्री गणेशचतुर्थीच्या वेळी दुर्वा निवडण्याची सेवा व्यवस्थित आणि भावपूर्ण करते.
आ. रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी तिने सनातन पंचांगातील देवतांची चित्रे पाहून चित्रे काढली. त्या वेळी तिने सांगितले, ‘‘एरव्ही प्रयत्न करूनही मला चित्र काढता येत नाही; पण सणाच्या दिवशी कार्यरत असलेले देवतेचे तत्त्व माझ्याकडून चित्र काढून घेते.’’
१०. कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) हिच्याकडून ईश्वरनिष्ठा शिकणे : कु. अर्चिता आणि कु. प्रार्थना (कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) एकाच वर्गात शिकतात. दळणवळण बंदीपूर्वी शाळा चालू असतांना एकदा प्रार्थनाच्या मैत्रिणीने तिला विचारले, ‘‘तुझी आई आजारी असते, तर तिला काही होईल’, याची तुला भीती वाटत नाही का ?’’ तेव्हा प्रार्थनाने तिला सांगितले, ‘‘माझे गुरुदेव माझ्या आईला काही होऊ देणार नाहीत’, याची मला निश्चिती आहे.’’ यातून ‘ईश्वरनिष्ठा कशी हवी ?’, हे अर्चिताच्या लक्षात आले.
११. स्थिरता : ‘प्रार्थनाने दिलेल्या उत्तराचा अर्चिताच्या मनावर खोलवर परिणाम झाला’, असे मला वाटते; कारण तिच्या रुग्णालयातील उपचारांच्या वेळी, तसेच घरात काही कठीण प्रसंग घडल्यास ती नेहमी स्थिर असते.
१२. व्यष्टी साधनेचे प्रयत्न : ती बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यात नियमितपणे सहभागी होते. सारणी लिखाण करणे, स्वयंसूचना सत्रे करणे, अर्धा घंटा बसून नामजप करणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, असे साधनेचे प्रयत्नही ती करते.
१३. स्वभावदोष : चूक न स्वीकारणे (स्वीकारण्यात कालावधी जातो), आळस
‘हे गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपण मला माझी क्षमता नसतांना माझी साधना होण्यासाठी दैवी बालिकेचे पालकत्व दिले आहे. ‘आपल्याला अपेक्षित असे आपणच माझ्याकडून करवून घ्या’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– सौ. मानसी मधुसूदन सोन्ना (कु. अर्चिताची आई), पुणे (४.२.२०२२)
प्रेमळ आणि संतांनी सांगितलेला नामजप भावपूर्ण करणारी ५८ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. अर्चिता मधुसूदन सोन्ना (वय ११ वर्षे) !
कु. प्रार्थना महेश पाठक (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) (कु. अर्चिताची मैत्रीण) पुणे
१.‘अर्चिता सर्वांशी प्रेमाने वागते. आमची ‘ऑनलाईन’ शाळा असते. आम्ही एकाच वर्गात शिकतो; परंतु काही कारणाने मी शाळेत उपस्थित नसेन, तर ती माझी प्रेमाने विचारपूस करते.
२. ती स्वतःच्या वस्तू सहजतेने इतरांना देते. दळणवळण बंदीपूर्वी एक दिवस मी तिच्या घरी गेले होते. रात्री तिच्या घरून निघतांना बाहेर पुष्कळ थंडी होती. तिने मला विचारले, ‘‘तुझ्याकडे ‘स्कार्फ’ (डोक्याला बांधायचा रुमाल) आहे का ?’’ तेव्हा माझ्याकडे ‘स्कार्फ’ नव्हता. तिने लगेच स्वतःचा स्कार्फ मला दिला.’
सौ. मनीषा महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
‘अर्चिताचा गुडघेदुखीचा त्रास दूर होण्यासाठी तिला संतांनी सांगितलेला नामजप तिने नियमितपणे आणि भावपूर्ण केला.’
श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
‘अर्चिताची आकलनक्षमता चांगली आहे. कुणीही सांगितलेली सूत्रे तिला लगेच आकलन होतात.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (११.२.२०२२)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |