आदर्श हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक महिला जिजाऊ झाली पाहिजे ! – सौ. विशाखा आठवले, हिंदु जनजागृती समिती

पारंपरिक अणि सामाजिक उपक्रमांसह महड येथे शिवजयंती उत्सव उत्साहात !

प्रवचनाला उपस्थित महिला

रायगड – छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रूर मुघल आक्रमकांच्या अत्याचाराचा आपल्या बुद्धीचातुर्याने आणि असामान्य शौर्याने बीमोड करून स्वराज्य स्थापन केले. राजमाता जिजाऊ यांनी रयतेच्या कल्याणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कष्टाने, धैर्याने आणि असिम त्यागाने शिवरायांना घडवले होते. जिजाऊंनी त्यांच्या पुत्राला देव, देश अन् धर्म यांसाठी घडवले, तसे ते घडले आणि पुढे त्यांनी देव, देश अन् धर्म यांचे रक्षण करून स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळेच ते रयतेचे राजे झाले. सद्य:स्थितीतही देव, देश, धर्म यांवर आघात होत आहेत, महिलांवरील अत्याचारांची सीमा ओलांडली आहे. हे थांबवायचे असेल, तर प्रत्येक महिलेने जिजाऊ बनून आपल्या मुलांना शिवबासारखे देव, देश अन् धर्म रक्षक बनवले पाहिजे. यासाठी महिलांनीही हिंदु संस्कृतीचे पालन करून मुलांवर संस्कार केले पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. विशाखा आठवले यांनी येथे केले. महड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित ‘शिवजयंती उत्सव २०२२’च्या निमित्ताने १८ फेब्रुवारी या दिवशी महिलांसाठी आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या.

महिलांनी आचारधर्माचे पालन करून, साधना करून आनंदी कसे रहावे, मुलांवर संस्कार कसे करावेत, तसेच स्वरक्षणासाठी महिलांनी प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे, आदी सूत्रांवर त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या पूर्वी सकाळी गावामध्ये ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबवली होती.

महड ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या दिवशीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी शिवस्मारकाचे पूजन, नंतर दुचाकीवरून मिरवणूक, दुपारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. सायंकाळी संपूर्ण गावात रांगोळ्या काढून आणि दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी फिरवण्यात आली. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.