वाराणसी येथील सनातनच्या सेवाकेंद्रातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६४ वर्षे) यांना होत असलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती
१. साधिकेला तीव्र त्रास होत असतांना स्वतःच्या हृदयातून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकू येणे, त्यानंतर त्रासाचा विसर पडून सेवा करता येणे
‘मला तीव्र त्रास होत असतांना माझ्या मनात नकारात्मक विचार वाढतात आणि मला त्रास सहन होत नाहीत. तेव्हा माझ्या मनात घरी जाण्याचा विचार तीव्र होतो आणि माझ्या मनाची अत्यंत घुसमट होते. मला ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे कळत नाही. अशा वेळी माझी श्री गुरूंवरील (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील) श्रद्धा अल्प पडते. त्या वेळी मला प्रयत्न करायलाही सुचत नाही. तेव्हा त्या त्या प्रसंगानुसार मला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने माझ्या हृदयातून ऐकू येतात. नंतर माझी हळूहळू निर्विचार अवस्था होते आणि मी हे सगळे त्रास विसरून पुन्हा सेवा करायला लागते.
२. तीव्र त्रास होत असतांना केवळ प्रार्थना केल्यावरही काही वेळाने त्रास न्यून होणे
वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या मार्गिकेतून चालतांना मला माझ्या पायांना सुया टोचल्यासारखे होणे, हात आणि पाय यांची नखे उपटल्यासारखे होणे, हाडांत अकस्मात् तीव्र वेदना आणि कळा येणे’, असा त्रास होतो. तेव्हा मला पटकन काही सुचत नाही. मी केवळ प्रार्थना करते. थोड्या वेळाने मला होणार्या वेदना आणि कळा न्यून होतात.
३. अनेक प्रकारचे तीव्र त्रास होणे
मला ‘अंगावर काळे डाग उमटून तेथे दुखणे, मध्येच झोपेतून जाग येणे, झोप न लागणे, अकस्मात् श्वासाला तीव्र दुर्गंध येऊन अस्वस्थ जाणवणे, कधी उकिरड्याचा, कधी कुजलेल्या कांद्याचा, कधी विष्ठेचा, तर कधीकधी मलमूत्राचा वास येणे’, असे अनेक प्रकारचे तीव्र त्रास होतात. कधी माझ्या हृदयातून सिगारेटचा वास येऊन मला तो असह्य होतो.
४. काही वेळा मला चित्रविचित्र वाईट शक्तींची भयानक स्थितीतील चित्रे दिसून ‘त्या पुष्कळ चिडलेल्या आहेत’, असे जाणवते; पण मला त्यांची भीती वाटत नाही. लगेचच माझा मारुतीचा नामजप चालू होतो.’
५. वाराणसी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात आलेल्या अनुभूती
अ. वाराणसी सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात श्रीरामाची मूर्ती आहे. ध्यानमंदिरात नामजप करतांना मला तेथील श्रीरामाच्या मूर्तीत शिवाचे दर्शन होते, तर कधी मारुतीचे दर्शन होते. मध्येच मला त्या मूर्तीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होते आणि त्यांच्यात श्रीकृष्णाचे दर्शन होते.
आ. ‘ध्यानमंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीचे डोळे हलत असून सेवाकेंद्रात सेवा करणार्या साधकांकडे श्रीराम पहात आहे’, असे मला जाणवते.
इ. मला ध्यानमंदिरात कधी कधी ‘ॐ’चा ध्वनी ऐकू येतो. वर्ष २०२१ मध्ये दिवाळीला यमदीपदान करून झाल्यावर मी ध्यानमंदिरात आल्यावर मला ३ वेळा ‘ॐ’चा ध्वनी ऐकू आला.
६. नामजपाला बसल्यावर आलेल्या अनुभूती
६ अ. कधी कधी मी नामजप करतांना ‘मी श्रीमद् शंकराचार्य यांच्या जवळ बसले आहे’, असे मला जाणवते.
६ आ. भगवान शिवाची मानसपूजा करतांना स्वतःच्या देहाचा बेल बनवून तो कधी शिवचरणी, तर कधी श्री गुरुचरणी अर्पण करणे, तेव्हा देहभान हरपणे : भगवान शिवाची मानसपूजा करतांना मी माझ्या संपूर्ण देहाचा बेल बनवून तो शिवचरणी अर्पण करते, तर कधी श्री गुरूंच्या चरणांची पूजा करून त्यांच्या चरणांवर देहाचा बेल वहाते. कधी मी श्री गुरूंच्या मस्तकावर बेल वहाते, तेव्हा ‘श्री गुरु शिवदशेत आहेत’, असे मला दिसते. कधी कधी त्यांची पाद्यपूजा करतांना मला देहाचे भान रहात नाही. माझ्याकडून पुष्कळ एकाग्रतेने पूजा होते. तेव्हा मी श्री गुरुचरणी सर्वस्व अर्पण केलेल्या अवस्थेत असते.
‘हे भगवंता, तुझ्या कृपेने आलेल्या अनुभूती तुझ्या चरणी समर्पित करते.’
– श्रीमती भाग्यश्री आणेकर (वय ६४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), वाराणसी सेवाकेंद्र, वाराणसी, उत्तरप्रदेश.
(७.२.२०२२)
|