‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करतांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !
‘गुरुमाऊली, तुझ्या कृपेमुळे मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ या ग्रंथाशी संबंधित सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवा करतांना ‘प्रत्येक सेवा आणि प्रसंग यांच्या माध्यमातून साधक घडावा अन् पुढे जावा’, ही तुला असलेली तीव्र तळमळ प्रकर्षाने जाणवली. या सेवेच्या कालावधीत तुझी सर्वज्ञता, प्रत्येक क्षणी तू माझी घेतलेली काळजी आणि सकारात्मक रहाण्यासाठी दिलेली प्रेरणा पदोपदी अनुभवता आली. तू दिलेली अनुभूतीपुष्पे तुझ्या चरणी कृतज्ञतेने अर्पण करत आहे.
१९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेच्या प्रकृतीविषयी विचारणा करणे आणि त्रास सहन करण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जाही देणे’, हा भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/554318.html
३. प्राणशक्ती अल्प असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले सेवारत असणे
हे त्रास होत असतांनाही गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) सेवारत असतात. ‘देवाने त्याच्या ‘सहनशीलता’ या गुणाशी एकरूप होण्याची संधी मला दिली आहे’, असा विचार मनात येऊन मला कृतज्ञता वाटली आणि ‘उद्यापासून सेवा करायचीच’, असा मी निश्चय केला.
४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या वचनाची आठवण होऊन मन सेवेत एकाग्र होणे
दुसर्या दिवशी सेवा करतांना माझे लक्ष एकसारखे दुखण्याकडे जात होते. काही केल्या माझे मन सेवेत एकाग्र होत नव्हते. तेव्हा प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त चैतन्याशी जोडा ।’ या वचनाची आठवण होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली. नंतर सेवेत एकाग्रता साध्य होऊ लागली.
५. प.पू. भुरानंद महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगाची आणि आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या ‘निर्वाणषट्क’मधील श्लोकाची आठवण होऊन ‘मी देह, मन किंवा बुद्धी नाही, तर आत्मा आहे आणि आत्मा आनंदी आहे’, याची जाणीव होणे
त्यानंतर एक दिवस त्रासाची तीव्रता वाढली. मी १ मिनिटसुद्धा बसू शकत नव्हते. तेव्हा मला प.पू. भुरानंद महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगाची आठवण झाली. महाराज एकदा देवळात गेले असतांना त्यांच्या पायावर मोठी घंटा पडली. त्यांच्या पायातून रक्त वाहू लागले, तरीही ते तसेच चालत होते. लोकांनी त्यांना याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘कुछ तो बुरा कर्म किया होगा इस पैर ने, इसिलिए भुगत रहा है ।’’ या वेळी आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेल्या ‘निर्वाणषट्क ।’ मधील एका श्लोकाची आठवण झाली.
मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिः न तेजो न वायुः
चिदानंदरूप: शिवोऽहं शिवोऽहम् ।। – निर्वाणषट्क, श्लोक १
अर्थ : मी मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त नाही, मी कान आणि जीभ नाही, मी नाक आणि डोळे नाही, मी आकाश नाही, भूमी नाही, तेज नाही आणि वायूही नाही; मी तर केवळ चिरंतन आनंदस्वरूप शिव आहे.
हे दोन्ही प्रसंग आठवून ‘मी देह नाही, मन नाही आणि बुद्धीही नाही. मी आत्मा आहे आणि आत्मा आनंदी आहे’, याची मला जाणीव झाली अन् पुष्कळ कृतज्ञता वाटली. देवाच्या कृपेने सेवा करता आली.
६. आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यानंतर विचार अल्प होणे आणि सेवेत एकाग्रता साधली जाणे
एक दिवस माझ्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागले. विचारांची तीव्रता आणि प्राबल्य पुष्कळ होते. मी नामजप करण्याचा प्रयत्न केला; पण मला विचारांवर मात करता आली नाही. माझे प्रयत्न पुष्कळ अल्प पडले. याचा परिणाम म्हणजे दुसर्या दिवशी सकाळी गजर वाजूनही मला जाग आली नाही. मी सकाळी ९.३० वाजता उठले. मी श्रीरामाला म्हणाले, ‘देवा, मी चुकले. मला क्षमा कर. मला सेवा करायची आहे. मी काय करू ?’ तेव्हा मागे कुणीतरी पाठवलेल्या एका लघुसंदेशाची श्रीरामाने आठवण करून दिली. (‘It’s okay, if you fall down and lose your spark. Just make sure that when you get up, you rise as the whole damn fire.’) ‘जीवनात चढ-उतार हे असणारच आहेत. एखाद्या वेळी तुम्ही पडलात (अपयशी ठरलात) आणि तुमच्यातील ठिणगी विझली (कार्य सिद्धीस नेण्यासाठी आवश्यक ती धडाडी हरपली), तरी हरकत नाही; परंतु जेव्हा तुम्ही परत उभे रहाल, तेव्हा त्या ठिणगीची धगधगती ज्वाला बनलेली असेल, याची निश्चिती असू द्या, म्हणजे अपयशाने तात्पुरती निराशा आली, तरी काही अडचण नाही; मात्र पुन्हा आरंभ करतांना संपूर्ण स्फूर्तीने गगनभरारी घेण्यास सिद्ध व्हा !’ तेव्हा मला पुष्कळ स्फूर्ती मिळाली. मी कागदावर नामजपाचे मंडल घालून मनातील विचार लिहिले आणि त्या कागदावर कापराचा चुरा घालून कागद जाळला. त्यानंतर विचारांचे प्रमाण पुष्कळ उणावले आणि मन सेवेत एकाग्र झाले. ग्रंथाशी संबंधित सेवा पूर्ण झाल्यानंतर हे त्रासही नाहीसे झाले.’
‘गुरुमाऊली, तुझ्या कृपेने फूल नाही; पण फुलाच्या पाकळीइतकी सेवा या जिवाकडून झाली. प्रत्येक क्षणी तू माझ्या समवेत होतीस. मी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘तुला अपेक्षित असे घडण्याचा ध्यास या जिवाच्या प्रत्येक श्वासासह जागृत राहू दे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
(समाप्त)
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(१८.५.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |