नंदुरबार येथे ॲक्सिस बँकेतील कर्मचार्‍याने एका महिलेची केली ५ लाख रुपयांची फसवणूक !

नंदुरबार – ॲक्सिस बँकेतील रोखपाल (कॅशिअर) तथा अधिकारी दिनेश सोनार यांनी येथील जळका बाजार चौक येथे रहाणार्‍या नंदिनी चौधरी यांना बनावट ठेव पावती देऊन ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सोनार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२० मार्च २०१८ या दिवशी दिनेश सोनार यांनी नंदिनी चौधरी यांच्या घरी जाऊन  ॲक्सिस बँकेतील ५ वर्षांसाठी ठेव पावती सिद्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून ५ लाख रुपयांचा धनादेश घेतला, त्यानंतर त्यांनी ॲक्सिस बँकेची ५ लाख रुपयांची बनावट ठेव पावती करून ती चौधरी यांना दिली; परंतु ही गोष्ट ४ वर्र्षांनंतर ठेव पावतीची रक्कम  काढण्यासाठी गेल्यानंतर उघडकीस आली आहे. नंदिनी यांनी २५ मार्च २०२१ या दिवशी बँकेत जाऊन ॲक्सिस बँकेतील अधिकारी राहुल दुसाने यांना ठेव पावती दाखवल्यानंतर त्यांनी ही पावती बनावट आहे, असे सांगितले. त्यानंतर दिनेश सोनार यांना दूरभाष करून विचारल्यानंतर ‘कुणाला काही सांगू नका, मी तुम्हाला भेटतो. सध्या माझ्याकडे पैसे नसून पैसे आल्यावर परत करतो’, असे आश्वासन दिले; परंतु अद्यापर्यंत त्यांनी पैसे परत न केल्यामुळे बँकेच्या वतीने सोनार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.