बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या भूमी घोटाळाप्रकरणी नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांना अटक !
सरकारी कर्मचारी आणि अधिकारीच घोटाळा करत असतील तर भारत देश कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे. – संपादक
बीड – वक्फ बोर्डाच्या भूमी घोटाळा प्रकरणात बीड येथील एस्.आय.टी.कडून नायब तहसीलदार प्रदीप पाडुळे आणि मंडल अधिकारी शिवशंकर गंगाधर सिंघणवाड यांना अटक करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाची भूमी मदतमास (साहाय्यासाठी) घोषित करून अन्य व्यक्तीच्या नावे केल्याच्या विषयी आष्टी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात मध्यरात्री दीड वाजता या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. मराठवाड्यातील वक्फ बोर्डाची ३५ सहस्र एकर भूमी भूमाफियांनी हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये मोठमोठे राजकीय नेते आणि महसूल मंडळातील अधिकारीही सहभागी असल्याचे पुढे येत आहे.
या प्रकरणी मराठवाड्यात आतापर्यंत ११ गुन्हे नोंद झाले आहेत. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपिर साहेब यांच्या ७१ एकर ८९ गुंठे भूमी घोटाळ्यात अपर जिल्हाधिकारी एन्.आर्. शेळके यांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. संपूर्ण मराठवाड्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डाच्या भूमी भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत.