भुसावळ येथील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास याचिका प्रविष्ट करणार !
|
|
भुसावळ – येथील महापालिकेच्या अंतर्गत नुकतेच झालेले रस्त्यांचे काम निकृष्ट आहे. काही दिवसांत या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठेकेदाराने या रस्त्यांची देखरेख करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी ७ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी भुसावळ परिवर्तन मंचाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे पुढे म्हणाले की, शहरात होत असलेली विविध विकासकामे ही निकृष्ट दर्जाची होत आहेत. रस्त्यांचा विषय यात गंभीर असून नगररचना विभागाच्या नकाशानुसार दिसणारे रस्ते हे प्रत्यक्षात लांबी आणि रुंदी यांच्यापेक्षा निम्म्याहूनही अल्प आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून याच नकाशानुसार रस्त्यांच्या कामांची निविदा काढून देयके घेण्यात येत आहेत. प्रत्यक्षात हे रस्ते मात्र अल्प रुंदीचे आहेत. यामुळे शहरातील अतिक्रमणालाही वाव मिळाला आहे.
यासह निविदा प्रक्रिया ही मोघम स्वरूपाची प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे ठराविक ठेकेदारांनाच कामे मिळत आहेत. निविदेतील माहितीत तफावत निर्माण केली जात आहे. योग्य काम आणि आकार यांचा स्पष्ट उल्लेख निविदेत नसल्यामुळे ‘ई टेंडरींग’ करूनही चांगले ठेकेदार शहरातील कामे घेण्यात पुढे धजावत नाहीत.
येथील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात लावण्यात आलेल्या साहित्यांच्या व्ययातही दुपटीची तफावत आहे. अल्प दर्जाच्या साहित्यांची खरेदी करून त्याचा व्यय उत्कृष्ट साहित्यांच्या व्ययात दाखवण्यात आला आहे, असे प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सांगितले.