रशियासमर्थक फुटीरतावाद्यांच्या आक्रमणात युक्रेनचे २ सैनिक ठार ! – युक्रेनचा दावा
रशियाच्या कारवाया वैश्विक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांच्यासाठी आव्हान ! – जी-७
(‘जी-७’ हा कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जापान या ७ देशांचा समूह आहे.)
कीव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या सीमासंघर्षाने आता जणू युद्धाचे स्वरूप घेतले आहे. पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक फुटीरतावाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये युक्रेनचे २ सैनिक ठार, तर ४ जण घायाळ झाले, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे.
रशियाच्या या कारवाईनंतर उभय देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे, असे म्हणायला वाव आहे. युक्रेनच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या फुटीरतावाद्यांनी गेल्या काही दिवसांत ७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. दुसरीकडे ‘युक्रेनच्या सैन्यानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने फुटीरतावादी गटांकडून प्रतिआक्रमण करण्यात आले’, असा प्रत्यारोप त्यांच्या अधिकार्यांनी केला आहे.
रशिया-युक्रेन सीमासंघर्षावरून ‘जी-७’ देशांच्या समुहाने संयुक्त वक्तव्य जारी केले आहे. सदस्य देशांच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे, ‘रशियाच्या सैन्याने क्रीमियावर अवैधरित्या मिळवलेला ताबा, तसेच बेलारूसमध्ये रशियाच्या सैन्याचे एकत्रीकरण या घटनांमुळे आम्ही चिंतित आहोत. रशियाच्या सैनिकांची होत असलेली जमवाजमव आणि अयोग्य रूपाने करण्यात येत असलेल्या कारवाया या वैश्विक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था यांच्यासाठी आव्हान आहे.’