सूडाचे राजकारण करणे हे आमचे हिंदुत्व नाही !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासमवेत झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य !

मुंबई – देशात सूडाचे राजकारण चालू झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच चालू राहिल्या, तर देशाचे भवितव्य काय ? सूडाचे राजकारण करणे, ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी २० फेब्रुवारी या दिवशी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राव आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘देशात परिवर्तनाची आवश्यकता आहे. परिवर्तनाच्या सूत्रावरून आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण आणि विकासकामे यांवर चर्चा झाली. संपूर्ण देशातील राज्ये शेजारधर्म विसरली आहेत. राज्याराज्यांत चांगले वातावरण राहिले पाहिजे.’’ या वेळी खासदार संजय राऊत, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांसह शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित होते.

विकासाच्या सूत्रावर उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली ! – चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगाणा

महाराष्ट्र आणि तेलंगाणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसमवेत देशातील परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे पुष्कळ मोठी होते. देशाच्या विकासाच्या सूत्रावर उद्धव ठाकरे यांच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना भाग्यनगरला येण्याचे आमंत्रण देणार आहे.