साधनेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले सोलापूर येथील श्री. राजेंद्र गुजर (वय ६५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
सोलापूर – प्रेमभाव, साधनेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले सोलापूर येथील श्री. राजेंद्र गुजर (वय ६५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेच्या ११२ व्या समष्टी संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी घोषित केली. श्री. गुजर यांच्या घरी एका अनौपचारिक भेटीच्या वेळी ही आनंदवार्ता त्यांना देण्यात आली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. मंजूषा गुजर (वय ६३ वर्षे) यांच्यासह सनातनचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. हिरालाल तिवारी, श्रीमती अलका व्हनमारे आदी साधक उपस्थित होते. या वेळी पू. (कु.) दीपाली मतकर यांनी श्री. गुजर यांचा श्रीकृष्णाचे चित्र देऊन सत्कार केला.
सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगामध्ये श्री. राजेंद्र गुजर हे नियमित उपस्थित रहातात. सत्संगात सांगितल्याप्रमाणे ते प्रतिदिन साधनेचे प्रयत्न प्रामाणिकपणे आणि तंतोतंत करतात. सत्संगात सांगितलेले प्रयत्न होण्यासाठी त्यांची धडपड पुष्कळ प्रमाणात असते. एका सत्संगात धनाच्या त्यागाचे महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच वस्तू स्वरूपात धनाचा त्याग करण्यासाठी सत्संग घेणार्या साधिकेला स्वतःहून संपर्क करून सांगितले.
श्री. गुजरकाका यांच्यातील साधनेच्या तळमळीमुळे त्यांची साधनेत प्रगती झाली ! – पू. (कु.) दीपाली मतकर
श्री. राजेंद्र गुजरकाका यांनी साधनेचे प्रयत्न तळमळीने आणि प्रामाणिकपणे केल्याने त्यांची साधनेत प्रगती झाली. त्यांच्यामध्ये साधकांप्रती पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यांच्यातील चिकाटी, सातत्य, तत्परता या गुणांमुळे प्रगती झाली आहे. काकांच्या शेजारी असलेल्या एका घरामध्ये साधक सेवेसाठी येत असत, त्या वेळीही ते प्रतिदिन ‘साधकांना काय हवे ?’ ते पहात होते.
सत्संगाप्रती कृतज्ञताभाव असणारे श्री. राजेंद्र गुजर !
श्री. गुजर यांच्यातील सातत्य या गुणामुळे त्यांनी आतापर्यंत झालेल्या ६५ सत्संगांपैकी एकही सत्संग चुकवला नाही, तसेच सत्संगातील प्रत्येक सूत्र त्यांनी व्यवस्थित लिहून ठेवले आहे.
साधना सत्संगातील मार्गदर्शन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच प्रगती झाली ! – श्री. राजेंद्र गुजर
प्रगती झालेली ऐकून पुष्कळ आनंद झाला. साधना सत्संगातील मार्गदर्शन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच प्रगती झाली.
प्रेमभाव आणि साधनेची तळमळ असलेले श्री. राजेंद्र गुजर (वय ६५ वर्षे) यांची सोलापूर येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
श्री. राजेंद्र गुजर, (वय ६५ वर्षे) यांची पू. (कु.) दीपाली मतकर आणि सोलापूर येथील साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर सेवाकेंद्र
१. ‘श्री. गुजरकाका नेहमी स्थिर, शांत, आनंदी आणि उत्साही असतात.
२. काकांकडे पाहिले किंवा त्यांचा आवाज ऐकला, तरी भावजागृती होते.’
३. प्रेमभाव
पूर्वी काकांच्या घराच्या खालच्या माळ्यावर सनातनचे सेवाकेंद्र होते. मला संगणकीय सेवा करण्यासाठी काही वेळा रात्री तिथे थांबावे लागायचे. त्या वेळी काका मला म्हणायचे, ‘‘रात्री तू थांबणार आहेस, तर तुला चहा किंवा दूध आणून देऊ का ? मी जागाच असतो.’’ मी काकांना सांगत असे, ‘‘मला काही नको. तुम्ही झोपा. मला काही लागले, तर मी सांगीन.’’ सकाळी लवकर ते मला चहा करून आणून द्यायचे. माझी सेवा झाल्यावर मी सोलापूर सेवाकेंद्रात जायला निघाल्यावर काका रिक्शा बोलावून मला रिक्शात बसवून द्यायचे आणि रिक्शाचालकाला पैसे देऊन मला व्यवस्थित पोचवण्यास सांगायचे.
श्री. हिरालाल तिवारी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सोलापूर
१. साधनेची ओढ
‘श्री. राजेंद्र गुजरकाका ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाला उपस्थित असतात. ते सत्संगात सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणतात. ते इतरांनाही साधनेची सूत्रे तळमळीने सांगतात.
२. सेवेची तळमळ
काकांना काही सेवा सांगितली, तर ती पूर्ण करण्यासाठी त्यांची पुष्कळ तळमळ असते. त्यांना जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा दिल्यावर ती ते तळमळीने पूर्ण करून त्याचा लगेच आढावाही देतात.’
श्रीमती अलका व्हनमारे, सोलापूर
१. प्रामाणिकपणा : ‘काका अधिकोषात चाकरीला होते. तिथे त्यांनी प्रामाणिकपणे चाकरी केली.
२. मुलाकडून अपेक्षा नसणे
गेली ५ वर्षे काकांचा मुलगा विदेशात आहे. त्यांना त्याची काही काळजी वाटत नाही. ते म्हणतात, ‘‘देव त्याची काळजी घेईल. मी त्याच्याकडून काही अपेक्षा करत नाही.’’
३. सेवेची तळमळ आणि चिकाटी
काकांना सनातनचे ग्रंथ ग्रंथालयात ठेवण्यासाठी ग्रंथालयांशी संपर्क करायला सांगितले होते. त्यासाठी त्यांना ग्रंथालयांशी वारंवार संपर्क करावा लागला. ते एका ग्रंथालयात ८ वेळा गेले.’
(७.२.२०२२)