नम्रता, गुरूंवरील श्रद्धा यांसह विविध गुणांचा समुच्चय असलेले कोल्हापूर येथील त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे (वय ५५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
माघ पौर्णिमेच्या रात्री झालेल्या सत्संगात सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी उलगडले गुपित !
कोल्हापूर – गुरूंवर दृढ श्रद्धा आणि अत्यंत विनम्र असणारे, साधकांना आधार वाटणारे, स्वतःला पालटण्याची तळमळ अन् स्वीकारण्याची वृत्ती असणारे, यांसह विविध गुणांचा समुच्चय असलेले कोल्हापूर येथील त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे (वय ५५ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी १५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी झालेल्या एका सत्संगात दिली. या आनंदवार्तेमुळे सर्वजण भावविभोर झाले. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या हस्ते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या आनंदवार्तेमुळे सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा सत्संग साधकांच्या व्यष्टी साधनेसाठी आणि समष्टी सेवेसाठी नवऊर्जा, उत्साह देणारा आणि भावभक्तीच्या सागरात डुंबण्याची एक अमूल्य पर्वणी असलेला झाला.
आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांचा गुरूंप्रती आणि संतांप्रती भाव वाढला आहे ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये
आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे यांचा गुरूंप्रती आणि संतांप्रती भाव वाढला आहे, तसेच पुढाकार घेऊन सेवा करण्याचा भागही वाढला आहे. तोच आदर्श समोर ठेवून साधकांनी सेवा करतांना प्रत्येकात गुरुतत्त्व पहायला हवे. त्यामुळे आपल्याला साधकांना गुण-दोषांसहित स्वीकारणे शक्य होईल. सातत्याने परिपूर्ण आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून श्रीगुरूंचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गेल्या काही मासांत आधुनिक वैद्य शिंदे यांनी पुढाकार घेऊन सेवा करण्यासह भावाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवले ! – आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के )
पूर्वी काही सेवांमध्ये आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांची नकारात्मकता असायची; मात्र गेल्या काही मासात त्यांनी त्यात आवर्जून पालट केला. त्यांच्या आवाजात मार्दवता वाढली आहे. ऐकण्याचा आणि स्वीकारण्याचा भाग वाढला आहे. पुढाकार घेऊन सेवा करण्यासह भावाच्या स्तरावरील प्रयत्न त्यांनी वाढवले आहेत.
आधुनिक वैद्य शिंदे यांच्यामध्ये पूर्णवेळ साधना करणार्या साधकांविषयी विशेष ममत्व ! – सौ. संगिता कडूकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
आधुनिक वैद्य शिंदे यांना पूर्णवेळ साधना करणार्या साधकांविषयी विशेष ममत्व जाणवते. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करतात. पूर्वीच्या तुलनेत त्यांच्यात उत्साह वाढला आहे. नम्रता हा त्यांचा विशेष गुण आहे. या वेळी वह्यांची मागणी घेणे, तसेच अनेक समष्टी सेवा यांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
हे सर्व परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी करवून घेतले ! – आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे
सत्कार झाल्यानंतर मनोगत व्यक्त करतांना आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे म्हणाले, ‘‘जे काही झाले ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतले. पूर्वी आध्यात्मिक पातळीविषयी अनेक वेळा माझ्या मनात विचार येत असत; मात्र नंतर ते विचार अल्प झाले. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शन आणि आधुनिक वैद्या श्रीमती शिल्पा कोठावळे यांनी दिलेले दृष्टीकोन यातूनही पुष्कळ साहाय्य झाले.’’
आधुनिक वैद्य शिंदे यांच्यातील नम्रता, इतरांना आधार वाटणे, हे गुण केवळ साधकांनाच जाणवतात असे नाही, तर समाजातील अनेकांनाही जाणवतात. आधुनिक वैद्य शिंदे हे कोल्हापूर येथील साधक वृत्तीचे प्रथितयश डॉक्टर असून नेहमी नम्र असतात, असे अनेक साधकांनी त्यांच्या मनोगतात सांगितले.
विशेष
१. आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केल्यावर त्यांच्यासह अन्य साधकांनाही भावाश्रू अनावर झाले.
२. ‘ज्या क्षणाची वाट पहात होतो अखेर तो क्षण आल्याने साधकांचा आनंद द्विगुणीत झाला.’ असे सर्वांना वाटले.
३. सत्संगातील वातावरण हलके आणि साधकांना अखंड भावस्थितीत डुंबून ठेवणारे होते.
सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनातील अनमोल सूत्रे
प्रत्येक कृतीला भाव-भक्तीची जोड द्या ! – (सद्गुरु) सुश्री (कु.) स्वाती खाडये
गुरुदेव नेहमी ‘साधकांनी कार्य किती केले ?’ यापेक्षा ‘त्यांची व्यष्टी साधना कशी चालू आहे ?’, ‘त्यांच्यात काय पालट होत आहेत ?’ यालाच प्राधान्य देतात. त्यामुळे साधकांनी प्रत्येक कृती करतांना त्याला भाव-भक्तीची जोड देऊन सेवा केली पाहिजे. रात्री झोपतांना ‘मी उद्या काय भाव ठेवणार’, हे ठरवून सकाळी उठल्यापासून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सनातनच्या कार्याला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद वाढत आहे. त्यासाठी साधकांनी परिपूर्ण नियोजन आणि व्यष्टी साधना चांगली करून सेवा केल्यास त्याची फलनिष्पत्ती वाढेल.