युक्रेन-रशिया वादात भारताची भूमिका !

१. युक्रेन-रशिया वादाची पार्श्वभूमी

‘युक्रेन हा सोव्हिएत संघाचा एक भाग होता. सोव्हिएत संघाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन हा वेगळा देश बनला. सध्या या युक्रेनविषयी वाद चालू आहे. तो वाद असा आहे की, जे देश सोव्हिएत संघापासून वेगळे झाले, त्यांना युरोपने ‘नाटो’चे सदस्य बनवले. (सोव्हिएत संघाच्या विरोधात सामूहिक सुरक्षा देण्यासाठी अमेरिका, कॅनडा आणि अनेक पश्चिम युरोपीय राष्ट्रे यांनी वर्ष १९४९ मध्ये ‘उत्तर अटलांटिक करार संघटना’ (नाटो) स्थापन केली.) त्यामुळे रशियाच्या मनामध्ये अशी भीती निर्माण झाली आहे की, युक्रेनलाही युरोप किंवा अमेरिका ‘नाटो’चे सदस्य बनवेल आणि त्या निमित्ताने ‘नाटो’चे सैन्य युक्रेनमध्ये येईल अन् ते एकदम रशियाच्या सीमेजवळ येईल. त्यामुळे रशियाच्या सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण होईल. हे लक्षात आल्यावर अमेरिकेने ‘अशा प्रकारचे आमचे काहीही नियोजन नाही. केवळ रशियाने युक्रेनवर आक्रमण करू नये, एवढेच आम्हाला वाटते’, असे स्पष्ट केले आहे.

२. रशियाने युक्रेनच्या सीमेवर २ लाख सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात करणे अन् युक्रेनसमवेतच्या वादात युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक चर्चा होऊन त्यात फलनिष्पत्ती न मिळणे

सध्या रशियाने युक्रेनच्या सीमेवर अनुमाने २ लाख सैन्य तैनात केले आहे. (काही सैन्य माघारी घेण्यास रशियाने प्रारंभ केला आहे, असे म्हटले जाते.) त्यासमवेत तेथे अत्याधुनिक तोफा, रणगाडे आणि शस्त्रेही ठेवलेली आहेत. असे असतांना रशिया म्हणतो की, त्यांचे हे सैन्य केवळ कवायत करण्यासाठी आलेले आहे. याउलट अमेरिका आणि युरोप यांना वाटते की, हे सैन्य केवळ युक्रेनवर आक्रमण करण्यासाठीच रशियाने तैनात केले आहे. या वादामध्ये युरोप, अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक चर्चा झाल्या; पण या चर्चांमधून काहीही निष्पन्न झाले नाही. अमेरिका पुन्हा पुन्हा म्हणत आहे, ‘रशिया युक्रेनवर आक्रमण करणार आहे’, तर रशिया ‘आम्ही युक्रेनवर आक्रमण करणार नाही’, असे सांगत आहे. एवढे मात्र नक्की की, तेथे जे चालले आहे, त्याला ‘ग्रे झोन वॉरफेअर’, म्हणजे ‘युद्ध नाही आणि शांतताही नाही’, असे म्हणता येईल.

ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन

३. युद्धाच्या भीतीने युरोप आणि अमेरिका यांच्या नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करणे अन् अमेरिकेने त्याच्या नागरिकांना युक्रेनमध्ये न रहाण्याची चेतावणी देणे

युक्रेनच्या सीमेवर केवळ आपल्या सैन्याला तैनात करून रशियाने युरोप आणि अमेरिका यांना घाबरवले आहे. त्यामुळे लढाई चालू न होताही युरोप आणि अमेरिका यांचे नागरिक युक्रेनमधून पळून जाऊ लागले आहेत. एवढेच नव्हे, तर अमेरिकेने युक्रेनमध्ये रहाणार्‍या त्याच्या नागरिकांना ‘तेथे रहाणे धोकादायक असल्याने तुम्ही तेथे राहू नका’, अशी चेतावणी दिली आहे. त्यामुळे ‘हा वाद लवकर संपेल’, अशी लक्षणे दिसत नाहीत.

४. युक्रेन-रशिया वादामध्ये भारताची तटस्थ भूमिका !

युक्रेन-रशिया वादामध्ये भारताची भूमिका ही राष्ट्राचे हित जपणारी हवी. अमेरिका, युरोप आणि रशिया तिघांशीही भारताचे चांगले संबंध आहेत अन् ते यापुढेही चांगले राहिले पाहिजेत. सध्या भारताने तटस्थपणाची भूमिका घेतली आहे. ‘हा वाद संयुक्त राष्ट्राच्या साहाय्याने सोडवला जावा आणि यावर लढाई होऊ नये’, अशी भारताची भूमिका आहे. भारताची ही भूमिका योग्यही आहे. या वादामध्ये भारत अमेरिकेला साथ देईल, अशी अमेरिकेला अपेक्षा आहे; पण भारत एकदम अमेरिकेच्या बाजूने जाणार नाही. काही दिवसांपूर्वी ‘क्वाड्रीलॅटरल को-ऑपरेशन’ (चतुर्भूज सहकार्य), म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यात एक मोठी बैठक झाली. त्यातही या सूत्रावर चर्चा करण्यात आली. तरीही भारत अमेरिकेला उघडपणे साहाय्य करेल, असे वाटत नाही. युक्रेनमध्ये पारंपरिक पद्धतीचे युद्ध होण्याची शक्यता फारच अल्प आहे. त्यामुळे केवळ दमदाटी आणि ‘ग्रे झोन वॉरफेअर’ चालू राहील. यासमवेतच ‘हायब्रिड वॉर’च्या (एकही गोळी न चालवता युद्ध पुकारणे) अन्य गोष्टीही तेथे केल्या जातील; पण बंदुका, रणगाडे, तोफखाना यांची लढाई होण्याची शक्यता फारच अल्प आहे. या वादावर संयुक्त राष्ट्राच्या साहाय्याने उपाय काढण्यात यावा, असे भारताला वाटते.

(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

५. युक्रेन -रशिया युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल ?

५ अ. भारतीय विद्यार्थी, राजनैतिक अधिकारी आणि नागरिक यांना देशात परत आणावे लागण्याची शक्यता : आज अनुमाने २० सहस्रांहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिकण्यासाठी गेलेले आहेत. अनेक भारतीय विद्यार्थी हे वैद्यकीय पदवी घेण्यासाठी सोव्हिएत संघातील देशांमध्ये जातात. ‘तेथे पदवी मिळवली, तर आपल्याला अधिक चांगली नोकरी मिळू शकेल’, असे त्यांना वाटते. जर युद्ध चालू झाले, तर त्यांना आणि तेथील भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांनाही परत यावे लागेल. ‘तेथे विदेशी नागरिक राहिले, तर अधिक धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकेल’, असे युरोप आणि अमेरिका यांनी म्हटले आहे. त्यामुळे भारतालाही त्याच्या नागरिकांना तेथून परत आणावे लागेल. युक्रेनमध्ये असलेल्या भारतियांची काळजी घेणे, हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे भारत सरकार युक्रेनला जाणार्‍या विमानांच्या फेर्‍या वाढवत आहे.

५ आ. युक्रेनसह होणारी वायू आणि खनिज तेल यांची आयात-निर्यात थांबवून भारतात महागाई वाढण्याची शक्यता : दुसरा परिणाम हा व्यापारावर होईल. भारताचा युक्रेनशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालू असल्याने अनेक व्यापार्‍यांना परत यावे लागेल. भारताची युक्रेनशी असलेली आयात-निर्यात थंडावेल. सर्व जगावर असाच परिणाम होणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर ही लढाई चालू झाली, तर रशियाकडून युरोपला ४० ते ४५ टक्के वायू आणि खनिज तेल यांचा जो पुरवठा होतो, तो थांबवण्यात येईल. त्यामुळे तेल आणि वायू यांचे मूल्य वाढेल. परिणामी देशात महागाई निर्माण होईल. तेलाच्या किंमती वाढल्याने भारतात आताही महागाई वाढलेली आहे. हे युद्ध झाले, तर भारतात आणखी महागाई वाढू शकते. त्यामुळे हे युद्ध न होणे, हे भारतासाठी अधिक सयुक्तिक आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर ज़ेलेंस्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन

६. युद्ध होऊ न देण्यासाठी भारताने प्रयत्न करणे, हे युक्रेनला त्याने केलेले सर्वांत चांगले साहाय्य असेल !

युक्रेनला सध्या ना अमेरिकेचे साहाय्य हवे आहे, ना युरोपीय देशांचे. ‘रशियाने त्यांच्या देशावर आक्रमण करू नये आणि अमेरिका जे त्यांच्या देशातील व्यापार्‍यांना परत बोलावत आहे, ते करू नये’, एवढीच युक्रेनची अपेक्षा आहे. मला वाटते की, भारताने युक्रेनला साहाय्य करायला पाहिजे. या परिस्थितीत युद्ध होणे अशक्य आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वादविवाद होत असेल, तर तो संयुक्त राष्ट्राने सोडवणे अधिक चांगले राहील. भारत युक्रेनला उघडपणे साहाय्य देण्याची शक्यता अल्प वाटते. भारत शांतपणे अमेरिका आणि रशिया यांच्याशी बोलत राहील अन् संयुक्त राष्ट्राचेही साहाय्य घेईल. अशा पद्धतीने मुत्सद्देगिरीच्या जोरावर युद्धाची शक्यता अल्प करत नेण्याचा भारत प्रयत्न करील. असे झाले, तर हे युक्रेनला भारताचे मिळालेले सर्वात चांगले साहाय्य असेल.

थोडक्यात युक्रेनवरील युद्धाची शक्यता अल्प असली, तरी रशियाच्या या ‘ग्रे झोन वॉरफेअर’मुळे तेथे घबराट पसरलेली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या शेअर बाजारची स्थिती प्रचंड खालीवर होत आहे. त्यामुळे युद्ध झाले नाही, तर ते भारतासाठी अधिक चांगले असेल.

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे