केडगाव (पुणे) येथे वीर सावरकर ग्रंथालय अन् वाचनालयाच्या स्थापनेच्या तपपूर्तीनिमित्त ४ दिवसांची व्याख्यानमाला पार पडली
केडगाव (ता. दौंड, जिल्हा पुणे), १९ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच संचलित वीर सावरकर ग्रंथालय आणि वाचनालय यांच्या स्थापनेला दासबोध जयंतीच्या दिवशी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाचनालयाच्या वतीने केडगाव येथे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तपपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला. दासबोध जयंतीला ग्रंथालयात सत्यनारायणाची पूजा आणि प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रंथालयापासून केडगाव येथील आंबेगाव माध्यमिक शाळेपर्यंत आणि परत ग्रंथालयापर्यंत ग्रंथ-दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथदिंडीमध्ये आंबेगाव विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक, तसेच सुभाष बाबूराव कुल महाविद्यालयाचे विद्यार्थी अन् प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘संत सेवा संघा’चे श्री. विजय खुटवड यांनी ‘पसायदान’ विषयी सांगितले. ‘ज्ञानेश्वरीमधील वैश्विक प्रार्थना, पसायदानाचा भावार्थ, ग्रंथकर्ते ज्ञानेश्वर माऊलींची त्यामागील भूमिका’ याविषयी त्यांनी उद्बोधन केले.
व्याख्यानमालेच्या दुसर्या दिवशी ‘दासबोध’ या विषयावर डॉ. श्रीधर देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या तिसर्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्यकी सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदु राष्ट्राविषयीची मते स्पष्ट करत सावरकर यांच्यावरील आरोपांचे खंडण केले. व्याख्यानमालेच्या चवथ्या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी ‘स्वराज्य ते सुराज्य’ याविषयी मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेत पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. आनंद थोरात, जिल्हा परिषद सदस्या सौ. राणी शेळके, श्री. झुंबरअप्पा गायकवाड, समस्त हिंदु आघाडीचे श्री. मिलींद एकबोटे, श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री. वासुदेवनाना काळे, तानाजी दिवेकर, डॉ. नीलेश लोणकर यांसह वाचनालयासाठी कार्य करणारे हितचिंतक, कार्यकर्ते उपस्थित होते. व्याख्यानमालेचा शेवट ‘संपूर्ण वन्दे मातरम्’च्या गायनाने झाला.
हिंदु संघटित झाले, तरच हिंदूंचा निभाव लागेल ! – सात्यकी सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू
कर्नाटक राज्यात हिजाबमध्ये स्त्रीला अडकवत हिजाबवरून झालेले रणकंदन अत्यंत अयोग्य आहे. सावरकरांना दोन वेळा जन्मठेप झाली. त्यांनी कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही. ‘सावरकर हुकूमशहा होते’, असे म्हणणार्यांना लाज वाटली पाहिजे. पितृभू आणि पुण्यभू हे निकष ज्यांनी पूर्ण केले ते हिंदु आहेत. समान रक्त, समान संस्कृती आणि समान इतिहास यांनी आपण जोडले गेले आहोत. हिंदु म्हणून एक झालात, तरच तुमचा निभाव लागणार आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे.
जिहादवरून हिंदुस्थानातील हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
भारतात अनेक प्रकारचे जिहाद चालू आहेत. जिहादवरून गदारोळ चालू असून हिंदुस्थानमध्येच हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यावर उपाय म्हणजे हिंदूंनी धर्मरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे. परदेशामध्ये हिंदु धर्मशास्त्राचा अभ्यास केला जात आहे. आपण मात्र पाश्चात्त्य संस्कृतीला कवटाळत आहोत. हे थांबवण्यासाठी प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन प्रत्येक हिंदु बांधवाला जागृत करायला हवे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे कार्य
‘नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करणे, त्यासाठी नववर्षदिनी पारंपरिक वेषात प्रभातफेरी काढणे, श्रीरामनवमी, पालखी सोहळा’ असे विविध उपक्रम प्रतिवर्षी साजरे करून युवा पिढीसमोर आदर्श ठेवण्याचे कार्य ‘स्वा. सावरकर युवा विचार मंच संघटने’च्या वतीने केले जात आहे. ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकाद्वारे सावरकरांचे साहित्य जनमानसांमध्ये प्रसारित करण्याचे कार्य डॉ. नीलेश लोणकर आणि त्यांचे सर्व सहकारी अविरतपणे करत आहेत. डॉ. नीलेश लोणकर यांच्या माध्यमातून केडगाव परिसरामध्ये नक्षत्रवन, व्याख्यानमाला, संस्कारवर्ग आदी स्तुत्य उपक्रम राबवले जातात.
क्षणचित्रे
१. स्वखर्चाने ग्रंथालय आणि वाचनालय यशस्वीरीत्या चालवल्याविषयी डॉ. नीलेश लोणकर आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली लोणकर यांचा सत्कार करण्यात आला.
२. वीर सावरकर ग्रंथालय अन् वाचनालय यांसाठी हातभार लावणारे हितचिंतक, मान्यवर यांचा पुरस्कार भेट देऊन सन्मान करण्यात आला.
३. १३ फेब्रुवारी या दिवशी या कार्यक्रमाच्या परिसरात सनातन निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
वीर सावरकर ग्रंथालय अन् वाचनालय यांच्या तपपूर्तीच्या दिवशी ग्रंथ-दिंडी काढण्यात आली. डॉ. नीलेश लोणकर यांनी दिंडीमध्ये असलेल्या पालखीत धर्मग्रंथांसह ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन’ ग्रंथही ठेवला होता. त्या फेरीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व आहे’, असा त्यांचा भाव होता. |