अरविंद नेगी ‘हिंदु आतंकवाद’ ठरवण्यातील प्यादे ?
|
भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी अरविंद नेगी यांना १८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) कह्यात घेतले आहे. भारतातील गुप्त माहिती ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेला पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्या हिमाचल प्रदेश येथील निवासस्थानी त्याविषयीची काही कागदपत्रेही सापडली आहेत.त्यामुळे त्यांच्यावर ‘यूएपीए’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते सिमला येथे पोलीस महासंचालकपदावर कार्यरत होते. अरविंद नेगी यांनी स्वत: ११ वर्षे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेमध्ये अन्वेषण अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांना काही मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अरविंद नेगी यांची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी जी ‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न केला, त्यांतील मुख्य प्रकरणांमध्ये अरविंद नेगी यांनी प्रमुख अन्वेषण अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. यामध्ये वर्ष २००७ मधील अजमेर दर्ग्यातील बाँबस्फोट, वर्ष २००७ मधील लाहोरमध्ये जाणार्या समझौता एक्सप्रेसमधील बाँबस्फोट, वर्ष २००८ मधील मालेगाव बाँबस्फोट आदी महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांतील एक साम्य दिसून येते, ते म्हणजे यापूर्वी देशात अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द रूढ करून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील कार्यकर्त्यांना देशविरोधी प्रकरणात गोवण्यात आले. यातील काही प्रकरणांत न्यायालयाने आरोपींना निर्दाेष मुक्त केले आहे, तर काही प्रकरणांची सुनावणी चालू असून त्यांतील काँग्रेसच्या हिंदुविरोधी कारवाया उघड होत आहेत. अरविंद नेगी यांच्यावर आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा होणारा आरोप पहाता त्यांच्या चौकशीतून देशातील हिंदुविरोधी षड्यंत्र बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अन्वेषण यंत्रणांनी याची कसून चौकशी करून देशवासियांपुढे सत्य ठेवावे, अशी अपेक्षा आहे.
काँग्रेसची चौकशी करा !
समझौता एक्सप्रेसमधील बाँबस्फोटात स्वामी असिमानंद यांना प्रमुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली. अजमेर दर्ग्याच्या बाँबस्फोटातही त्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्याच बाँबस्फोटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले, तर मालेगाव बाँबस्फोटात आताच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना आरोपी करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यापासूनच्या आतापर्यंतच्या कालखंडात देशाला जिहादी आतंकवादाने पोखरले आहे. काश्मीरमध्ये सातत्याने होणारी आतंकवादी आक्रमणे असोत, देशातील हिंदु नेत्यांच्या क्रूर हत्या असोत वा मुंबईतील २६ नोव्हेंबरचे आतंकवादी आक्रमण असो. देश स्वतंत्र झाल्यापासून या आंतकवादी कारवाया चालूच आहेत. या सर्व आतंकवादी कारवाया देशातील धर्मांधांच्या साहाय्यानेच चालू असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे; मात्र त्यांना कधीही ‘इस्लामिक आतंकवादी कारवाया’ म्हणण्याचे धाडस काँग्रेसने दाखवले नाही; मात्र वर्ष २००७ पासून अचानकपणे तथाकथित ‘हिंदु आतंकवाद’ रूढ करण्याचा प्रकार निश्चितच संशयास्पद आहे. काँग्रेसने निर्माण केलेल्या या बागुलबुव्याची ती सत्तेत असतांना चौकशी होण्याची सूतराम शक्यता नव्हती. प्रखर राष्ट्रवादी असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात ही चौकशी होईल, अशी अपेक्षा आहे. अरविंद नेगी यांच्यासारख्या अधिकार्यांची नियुक्ती त्यासाठीच करण्यात आली होती का ? याचीही चौकशी व्हायला हवी.
वर्ष २०१७ मध्ये देहली येथे अटक करण्यात आलेला आतंकवादी महंमद अशरफ याचा अजमेर दर्ग्यातील बाँबस्फोटाशी असलेला संबंध उघड झाला असून यात मुख्य आरोपी करण्यात आलेले स्वामी असीमानंद यांसह अन्य आरोपींची न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली आहे. समझौता बाँबस्फोटातूनही स्वामी असीमानंद यांना न्यायालयाने निर्दाेष मुक्त केले आहे. मालेगावमधील बाँबस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी सध्या मुंबईमध्ये ‘एन्.आय.ए.’च्या विशेष न्यायालयात चालू आहे. या खटल्याच्या सुनावणीमध्ये काँग्रेसचा हिंदुविरोधी चेहरा उघड होत आहे.
महाराष्ट्रातील ‘अरविंद नेगी’ कोण ?
आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि सध्या खंडणीचे अनेक गुन्हे नोंद असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांना अटक केली. वर्ष २००८ मध्ये हा बाँबस्फोट घडूनही खटल्याची सुनावणी वर्ष २०२० मध्ये चालू करण्यात आली. ९ वर्षांनी खटला चालू करून हिंदुत्वनिष्ठांना कारागृहात खितपत ठेवण्यात आले. यामधील एका साक्षीदाराने मालेगाव बाँबस्फोटात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अन्य नेत्यांची नावे घेण्यासाठी त्याला ओलीस ठेवल्याची साक्ष दिली आहे. आरोपी समीर कुलकर्णी यांनी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, सुशीलकुमार शिंदे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आदी नेत्यांची नावे घेऊन त्यांनी ‘हिंदु आतंकवाद’ आणि ‘भगवा आतंकवाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची साक्ष दिली आहे. महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकार काळात मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात २ पाकिस्तानी आणि ८ स्थानिक मुसलमान यांना अटक करण्यात आली होती; मात्र हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी सरकारने साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठांना बलपूर्वक पकडण्यासाठी दबाव आणला’, असा गंभीर आरोप केला. अशा प्रकारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी या पुरोगाम्यांच्या हत्येच्या प्रकरणांतही हिंदुत्वनिष्ठांना जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांतील ‘अरविंद नेगी’ कोण ? आणि त्यामागील खरे सूत्रधार कोण ? यांचाही शोध घ्यायला हवा !