परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या सनातनच्या ज्ञानमय आणि चैतन्यमय ग्रंथांचे स्तवन !
सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेली अद्वितीय ग्रंथनिर्मिती
१ अ. सनातनचे विविध ग्रंथ म्हणजे ‘जणू पाचवा वेदच !’ : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी (प.पू. गुरुदेवांनी) निर्मिलेले सनातनचे विविध ग्रंथ म्हणजे ‘जणू पाचवा वेदच !’ जानेवारी २०२२ पर्यंत सनातनच्या ३५० ग्रंथांच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी सर्व विषयांना स्पर्श केला आहे. पृथ्वीतलावर आतापर्यंत कुठेही उपलब्ध न झालेले सूक्ष्म ज्ञानही संकलित करून गुरुदेवांनी त्याचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. आणखी सहस्रो ग्रंथ होतील, एवढे लिखाण त्यांनी विषयानुरूप संकेतांक देऊन संग्रहित करून ठेवले आहे. आजही गुरुदेवांचे ग्रंथसंकलनाचे कार्य अविरतपणे चालू आहे.
१ आ. महान लेखनकार्याची परंपरा – महर्षि वेदव्यास, समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले ! : द्वापरयुगात महर्षि वेदव्यासांनी महान लेखनकार्य केले आहे. महर्षि व्यासांनंतर या कलियुगात महान संत समर्थ रामदासस्वामी यांनी असे कार्य केले होते. समर्थ रामदासस्वामींच्या नंतर हे महान अवतारी कार्य कुणी केले असेल, तर ते केवळ आणि केवळ आपल्या प.पू. गुरुमाऊलीनेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच) केले आहे.
१ इ. सनातनचे ग्रंथ परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यमय लेखणीतून सिद्ध होत आहेत. हे ग्रंथ म्हणजे ज्ञानगुरु परात्पर गुरुदेवांचेच ज्ञानमय रूप आहे. या ग्रंथस्तवनाच्या माध्यमातून ज्ञानगुरूंचेच स्तवन होते.
२. सनातनच्या ग्रंथांची महानता !
२ अ. संसारसागरावरील पूल : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे ‘ईश्वरभक्ती केल्याने तोच (ईश्वर) आपल्याला संसारसागरातून पैलतीराला, म्हणजेच मोक्षाला नेईल’, असा महान उपदेश करणारे आहेत. सनातनचे ग्रंथ ऐलतीरापासून पैलतीराला नेणार्या पुलाप्रमाणे, म्हणजेच मायारूपी ऐलतीरापासून मोक्षरूपी पैलतीराला नेणारा संसारसागरावरील पूलच आहे.
२ आ. आध्यात्मिक मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणि ! : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ, म्हणजे जिज्ञासू, वाचक आणि साधक यांच्या आध्यात्मिक मनोकामना पूर्ण करणारे आहेत. या ग्रंथांतून केलेल्या सखोल विश्लेषणामुळे वाचकांच्या सर्व शंकांचे निरसन होते. त्यामुळे हे ग्रंथ म्हणजे योग्य दिशादर्शन करणारा चिंतामणिच आहे. (सर्व मनोकामना पूर्ण करणे, हे चिंतामणि या मण्याचे वैशिष्ट्य आहे. – संकलक)
२ इ. सनातनचे ग्रंथ म्हणजे आत्मराज्य आणि स्वराज्य याची अनुभूती देणारा कल्पवृक्ष ! : सनातनच्या माध्यमातून साधना करणार्या जिवांचे ‘ईश्वरप्राप्ती’ (आत्मराज्य) हे व्यष्टी ध्येय असते आणि ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ (स्वराज्य) हे समष्टी ध्येय असते. हे ध्येय गाठण्यासाठी सनातनचे ग्रंथ दिशादर्शन करतात. त्यामुळे परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे आत्मराज्य आणि स्वराज्य, म्हणजेच अंतर्बाह्य हिंदु राष्ट्र स्थापनेची अनुभूती देणारा कल्पवृक्षच आहे.
२ ई. मार्गदर्शक आणि प्रकाशमय दिव्य दीप : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे ‘व्यवहार आणि साधना यांची सांगड कशी घालावी ?’, यासंदर्भात उपदेश करणारा उंबरठ्यावरील दिव्यासारखा आहे.
‘संसारात राहून आणि व्यवहार सांभाळून साधना कशी करावी ?’, हे शिकवणारे, मायेतही ब्रह्म अनुभवण्यासाठी साधनेची प्रायोगिक स्तरावरील सूत्रे शिकवणारा मार्गदर्शक आणि प्रकाशमय दिव्य दीपच आहे.
२ उ. अज्ञानाचा अंधःकार तात्काळ नाहीसा करत चैतन्य प्रदान करणारा चैतन्यसूर्य ! : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ, म्हणजे जणू चैतन्यसूर्यच आहे. सनातनचे ग्रंथ कुठेही असले, साधक किंवा जिज्ञासू यांच्याकडे असले, तरी ते त्यांच्या अज्ञानाचा अंधःकार तात्काळ नाहीसा करत चैतन्यसूर्यासमान त्यांना ज्ञानप्रकाश आणि चैतन्य प्रदान करणारे आहेत.
२ ऊ. भवसागर पार करायला साहाय्यभूत : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे भवसागरातून तारणारी नौकाच आहे. विविध विषयांच्या इच्छा आणि वासना यांमुळे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून जिवाला भवसागरात गटांगळ्या खाव्या लागतात; परंतु साधना केल्याने मानवाच्या सर्व वासना नाहीशा होऊन भवसागर पार करणे शक्य होते. हे ग्रंथ आपल्याला ईश्वरभक्तीच्या नावेत बसवून भवसागर पार करायला
साहाय्य करतात.
२ ए. आपत्काळातून तारणारी नौका ! : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ, म्हणजे जणू आपत्काळातून तारणारी नौकाच आहे. ‘भीषण आपत्काळ येणार आहे’, हे अनेक द्रष्ट्यांनी सांगितले आहे; परंतु यावरील उपाययोजनांच्या संदर्भात मार्गदर्शन केवळ परात्पर गुरुदेवांनी केले आहे. हा आपत्काळ सुसह्य होण्यासाठी दैनंदिन स्तरावर करावयाच्या सिद्धतांच्या समवेत मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, हे त्यांनी ग्रंथमालिकेच्या माध्यमातून सर्वांना सांगितले. परात्पर गुरुदेव सतत अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी झटत असल्याने त्यांनी ‘आपत्काळात जीवितरक्षणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात ?’, यासमवेत ‘आता जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा’, यासंदर्भातही मार्गदर्शन केले आहे. या ग्रंथांतील चैतन्यच येणार्या काळात आपले संरक्षण करील.
२ ऐ. जीवनाचे सोने करणारा परीस ! : परात्पर गुरुदेवांनी निर्मिलेले सनातनचे ग्रंथ म्हणजे लोखंडाचेही सोने करणार्या परिसाप्रमाणे आहेत. हे ग्रंथ वाचून अनेकांनी त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाल्याची अनुभूती घेतली आहे. या ग्रंथांतून आपल्या जीवनाला गुरुभक्ती आणि ईश्वरभक्ती यांचा परीसस्पर्श होतो आणि ते आपले जीवन उजळवून टाकतात.
३. कृतज्ञता
साक्षात् ज्ञानमय गुरूंचेच रूप असलेल्या या सनातनच्या अनमोल ग्रंथसंपदेला कोटीशः नमन ! आजच्या या घोर कलियुगातही एवढे महान कार्य करून विश्वोद्धार करणार्या महान अवतारी ज्ञानगुरूंच्या म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (१८.२.२०२२)