ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
मुंबई – पुढील आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) सर्वात मोठा घोटाळा उघड करणार आहे, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी याविषयी ट्वीट करून ईडीच्या अधिकार्यांच्या बेनामी संपत्तीवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारी या दिवशी शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ईडी आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले.
या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, पालघरमध्ये २६० कोटी रुपयांचा प्रकल्प चालू आहे. हा प्रकल्प सोमय्या यांच्या मुलाच्या नावावर असून त्यांची पत्नी संचालकपदावर आहे. या प्रकल्पात ईडीच्या एका अधिकार्याची बेनामी संपत्ती गुंतली आहे. यापुढे नियमितपणे किरीट सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार, असेही राऊत यांनी सांगितले.
मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालये ही खंडणीखोर बनली आहेत. महाराष्ट्राला कसे लुटले ? कोट्यवधींची अफरातफर कशी केली ? याची सगळी माहिती पुढील आठवड्यात उघड करणार, असे संजय राऊत यांनी सांगितले.