रशियाने आक्रमण केल्यास युक्रेनला साहाय्य करू ! – जो बायडेन

युक्रेनवर आक्रमण केल्यास रशियावर कठोर निर्बंध लादणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – आम्हाला संघर्ष नको आहे; परंतु रशियाने जर युक्रेनवर आक्रमण केले, तर आम्ही युक्रेनला साहाय्य करू. युक्रेनवर आक्रमण करणे चुकीचे असून विनाशकारी आणि अनावश्यक युद्धासाठी रशिया उत्तरदायी राहील, अशी चेतावणी देणारे ट्वीट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. ‘रशियाच्या सैन्याने युक्रेनला चारही बाजूंनी घेरले असून रशिया पुढील काही दिवसांत युक्रेनवर आक्रमण करण्याची योजना आखत आहे’, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

१. जो बायडेन पुढे म्हणाले की, युक्रेनला चिथावणी देण्याचा प्रयत्न चालू आहे. रशियाने असा खेळ यापूर्वीही खेळला आहे. संयुक्त राष्ट्रे, अमेरिका आणि आमचे सहयोगी युक्रेनच्या जनतेचे समर्थन करणार आहेत. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास पाश्चात्त्य देश रशियावर कठोर निर्बंध लादण्यास सिद्ध आहेत.

 (सौजन्य : TV9 Bharatvarsh)

२. बायडेन यांनी ‘युद्धाने काहीही होणार नाही. त्यामुळे आपण चर्चा करून यावर उपाय काढू. सध्या रशियाकडून वेळ गेलेली नाही. त्यांनी चर्चेस होकार द्यावा. रशिया अजूनही राजनैतिक मार्गाने या समस्येवर उपाय काढू शकतो’, असे आवाहनही केले आहे.