सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय
सिंगापूर येथील धर्माभिमानी श्री. मनीष त्रिपाठी यांनी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय आणि ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये
परिचय
सिंगापूर येथील श्री. मनीष त्रिपाठी तेथील (एस्आय्2आय् लि.पब्लिक लिस्टेड – एस्आय्2आय् (पब्लिक लिस्टेड ॲट एस्जीएक्स सिंगापूर) या आस्थापनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.) आहेत, तसेच ते १०० कोटी डॉलरपेक्षा अधिक मूल्यांकन असलेल्या अन् मानांकित आस्थापनाचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रुप सी.ई.ओ.) म्हणून कार्यभार सांभाळतात. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आमच्याशी (‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या साधकांशी) भेट झाली. आम्ही त्यांना एस्.एस्.आर्.एफ्.चे कार्य सांगून एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाची माहिती दिली. पहिल्या भेटीपासूनच आम्हाला ‘ती एक चांगली व्यक्ती असून तिच्याशी एक आध्यात्मिक नाते आहे’, असे जाणवले. त्यांनी त्यांच्या सहकार्यांसाठी एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने ‘मानसिक तणाव आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले. व्याख्यानानंतर त्यांनी सांगितले, ‘‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांत काहीतरी वेगळेपण असून त्यांच्यातून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत आहे.’’
देवाची कृपा आणि श्री. मनीष यांची तळमळ यांमुळे जानेवारी २०१७ मध्ये ते एका दिवसासाठी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे अन् त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. ‘औदुंबराची झाडे आपोआप उगवणे’, हे तर्कशास्त्राच्या विरुद्ध असून ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य आहे’, असे श्री. मनीष त्रिपाठी यांनी सांगणे
श्री. मनीष यांना संपूर्ण रामनाथी आश्रम दाखवण्यात आला. त्या वेळी ध्यानमंदिराच्या बाहेरील भागात आपोआप उगवलेली औदुंबराची झाडे पाहून श्री. मनीष म्हणाले, ‘‘औदुंबराची झाडे आपोआप उगवणे’, हे आश्चर्यकारक आहे; कारण प्रत्यक्षात हे अशक्य आहे. हे तर्कशास्त्राच्या विरुद्ध असून विस्मयकारी आहे. अशा प्रकारे आध्यात्मिक शक्ती जागृत होणे अन् तिचे अस्तित्व जाणवणे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य आहे. मी इथे वावरतांना मला ती शक्ती जाणवत आहे.
(‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आश्रमातील ध्यानमंदिरात प्रतिदिन ‘दत्तमाला’ या मंत्राचे पठण केले जाते. हे पठण चालू झाल्यानंतर काही मासांतच ध्यानमंदिराच्या बाहेरील अंगणात औदुंबराची अनेक झाडे आपोआप उगवली आहेत.’ – संकलक)
२. साधकांनी लिहिलेल्या चुकांचा फलक पाहिल्यावर स्वतःच्या कामाच्या ठिकाणी चुका लिहिण्यासाठी फलक ठेवण्याची सिद्धता दर्शवणे
श्री. मनीष यांना ‘एस्.एस्.आर्.एफ्.’द्वारे शिकवण्यात येत असलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी ठाऊक आहे. ते त्याचे समर्थनही करतात. या प्रक्रियेच्या अंतर्गत आश्रमातील साधकांनी लिहिलेल्या चुकांचा फलक पाहिल्यावर त्यांनी आश्रमातील साधक ही प्रक्रिया कशा पद्धतीने राबवतात, हे उत्सुकतेने जाणून घेतले. ते म्हणाले, ‘‘मीसुद्धा माझ्या कामाच्या ठिकाणी तेथील लोकांना त्यांच्या चुका लिहिता याव्यात’, यासाठी एक फलक ठेवण्याचा विचार करत आहे. या प्रक्रियेचा लाभ लोकांनी करून घ्यावा, यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाची ही संकल्पना मला शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवायची आहे.’’
३. कलेशी संबंधित सेवा करणार्या साधकांनी लिहिलेला साधनेचा आढावा पाहून ‘हे हस्ताक्षर रचनात्मक असून त्यातून ‘प्रामाणिकपणा’ प्रक्षेपित होत आहे’, असे श्री. मनीष त्रिपाठी यांनी सांगणे
कलेशी संबंधित सेवा चालू असलेल्या कक्षात गेल्यावर तेथील साधकांनी एका फलकावर त्यांच्या साधनेचा आढावा लिहिला होता. तो वाचतांना श्री. मनीष यांनी केलेले निरीक्षण सांगितले, ‘‘या साधकांचे हस्ताक्षर रचनात्मक असून त्यातून ‘प्रामाणिकपणा’ प्रक्षेपित होत आहे. आढावा अनेक साधकांनी लिहिलेला असूनही त्यांच्या अक्षरांमध्ये साम्य आहे. येथील सर्व साधक कलेच्या माध्यमातून साधना करत असल्यामुळे देवाच्या कृपेने त्यांच्या हस्ताक्षराप्रमाणे साधकांची स्पंदनेही (फ्रिक्वेन्सीज) एकमेकांशी जुळली आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’’
४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वानेच साधकांना निःस्वार्थपणे विचार अन् आचार करण्याची प्रेरणा मिळते आणि ही सकारात्मक ऊर्जा जगाच्या कानाकोपर्यांत पसरल्यावर बाहेरील जगात असणारी जोरदार स्पर्धा थांबेल’, असे श्री. मनीष यांनी सांगणे
‘दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणारे साधक वेतन न घेता, तसेच एकही दिवस सुटी न घेता साधना म्हणून सेवा करतात’, हे कळल्यावर श्री. मनीष म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांपासून मी एक वर्तमानपत्र काढण्याच्या प्रयत्नात आहे; मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळ्या समस्या उद्भवत असल्यामुळे अजूनही मी त्यासाठी संघर्ष करत आहे. येथे निःस्वार्थपणे अन् समर्पणभावाने सेवा करणार्या साधकांना पाहून मी प्रेरित झालो आहे. ते सर्व अंतःपे्ररणेने कठोर परिश्रम करत आहेत. ‘त्यांचा त्याग अन् तपस्या ही केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि त्यांची कृपा यांच्यामुळे शक्य आहे’, असे मला वाटते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वानेच साधकांना आध्यात्मिकदृष्ट्या योग्य विचार मिळून निःस्वार्थपणे सेवा करण्याची प्रेरणा मिळते. ही सकारात्मक ऊर्जा जगाच्या कानाकोपर्यांत पसरली अन् लोक निःस्वार्थपणे काम करू लागले, तर सध्या सर्वत्रच्या लोकांमध्ये चालू असलेली ‘कोणत्याही परिस्थितीत विजयी होणे’, ही स्पर्धा थांबेल.’’
५. स्वयंपाकघरात असणारी शांत ऊर्जा अन्य कुठेही पहायला न मिळणे आणि साधिकांनी केलेला सात्त्विक स्वयंपाक अन्नाच्या माध्यमातून आत्म्यापर्यंत पोचणे
आश्रमातील ‘अन्नपूर्णा कक्ष (स्वयंपाकघर)’ पहातांनाश्री. मनीष म्हणाले, ‘‘मी जगभर प्रवास करतांना अनेक स्वयंपाकघर पाहिली आहेत. प्रत्येक ठिकाणी मला तेथे अव्यवस्थितपणा आणि गोंधळ पहायला मिळाला आहे. येथील स्वयंपाकघर एवढे मोठे असूनही आणि येथे २०० साधकांसाठी स्वयंपाक सिद्ध होत असूनही येथे पुष्कळ शांती आहे. स्वयंपाकघरात एवढी शांत ऊर्जा मी कुठेही पाहिली नाही. येथील स्वयंपाकही अतिशय सात्त्विक आहे. स्वयंपाक करणार्या साधकांचा प्रेमभाव अन्नाच्या माध्यमातून माझ्या आत्म्यापर्यंत पोचला अन् मला माझ्या आईच्या हातच्या जेवणाची आठवण झाली.’’
६. जगभरातील ४१ देशांमध्ये अनेक बहुराष्ट्रीय आस्थापनांचे प्रमुख म्हणून कार्य करण्याचे भाग्य लाभले; परंतु हा आश्रम अद्वितीय असून तो मनाला भावणे
श्री. मनीष आश्रमात आले होते, तेव्हा एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी शिबिर चालू होते. त्या शिबिरात मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले, ‘‘मी जगभरातील ४१ देशांमध्ये फिरलो आहे. गेल्या १७ वर्षांपासून मी सिंगापूर येथे रहात आहे. मला अनेक बहुराष्ट्रीय आस्थापनांचे (एम्एन्सीचे) प्रमुख म्हणून कार्य करण्याचे भाग्य लाभले. अनेक देश आणि अनेक क्षेत्रे यांतील लोकांना मी भेटलो आहे; परंतु हा आश्रम अद्वितीय असून तो मला भावला आहे. येथील लोक आणि वातावरण हे जीवनात पालट करणारे आहे. मी जगभरातील अनेक परिषदांमध्ये विषय मांडले आहेत; परंतु आश्रमात आल्यावर मला माझ्या आजवरच्या अनुभवविश्वाच्या पलीकडे सर्वकाही असल्याचे जाणवते. त्यामुळे ‘काय बोलावे’, हेच मला सुचत नाही. याचे कारण म्हणजे हे क्षेत्र माझ्यासाठी पूर्णतः नवीन आहे. हे विश्व आणि अध्यात्म यांविषयी माझ्यापेक्षा अधिक जाण असणारे, तसेच या जगताला खर्या अर्थाने जाणून घेण्यात माझ्यापेक्षा पुढे असणारे साधक येथे आहेत. ‘मी अध्यात्मात अजून नवखा आहे’, असे मला वाटते.
आश्रमात सर्वत्र शांतता जाणवते. येथील सर्व लोक खरोखर आनंदी आहेत. असे मी कुठेही पाहिले नाही. परात्पर गुरु डॉक्टरांचे कृपाशीर्वाद अन् मार्गदर्शन यांमुळे येथील साधक अध्यात्माशी जोडले गेले आहेत. त्यांच्यात अहं नाही. आश्रमातून सकारात्मकता आणि शांती प्रक्षेपित होते. तुम्हाला कदाचित जाणवत नसेल; परंतु मी एका बेभान झालेल्या जगतातून येथे आलो असल्याने मला हा भेद जाणवतो. तुमच्या समवेत रहायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो.’’
७. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना श्री. मनीष यांच्यामध्ये नम्रता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेली श्रद्धा जाणवणे
‘श्री. मनीष यांच्या बोलण्यात नम्रता आहे. वेळ अल्प असल्याने त्यांचे आश्रमदर्शन अतिशय घाईत करण्यात येत होते. त्या वेळी श्री. मनीष यांना सांगितलेल्या प्रत्येक सूचनेचे त्यांनी पालन केले. यावरून त्यांची नम्रता, शिकण्याची वृत्ती आणि आश्रम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेली श्रद्धा दिसून येते.’ – शिबिरातील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक
८. तीन भिन्न देशांतील लहान मुलांना एकमेकांची भाषा येत नसूनही त्यांच्यात एकोपा जाणवणे
‘आश्रमातील परिसरात मी लहान मुलांना खेळतांना पाहिले. त्यापैकी चि. हाना पांक्रात्स ही क्रोएशियाची आहे. कु. शार्लाेते सेंतकेरेस्ती ही आस्ट्रियाची, तर चि. नंदन कुदरवळ्ळी हा भारतातील आहे. त्यांना एकमेकांची भाषा येत नाही, तरीही त्यांच्यामध्ये एकोपा असल्याचे जाणवले. त्यांना पाहून ‘ते आंतरिकदृष्ट्या जोडले गेले आहेत’, असे मला वाटले.’ – श्री. मनीष त्रिपाठी
९. श्री. मनीष यांनी एका संतांच्या सत्संगात स्वतःची स्थिती मोकळेपणाने सांगणे आणि त्यावर त्या संतांनी ‘तुमची गेल्या जन्मीची साधना असून पुढच्या प्रगतीसाठी अध्यात्मप्रसाराची समष्टी साधना करायला हवी’, असे सांगणे
त्या रात्री श्री. मनीष यांना आश्रमातील सत्संगात बसायला मिळाले. त्या वेळी त्यांची भावजागृती झाली होती. सत्संगात उपस्थित असलेल्या संतांनी त्यांना ‘साधना म्हणजे काय ? ती करणे का महत्त्वाचे आहे ?’ इत्यादींविषयी सविस्तर सांगितले, तसेच त्यांनी स्वतःच्या साधना-प्रवासाविषयीही सांगितले. ते सर्व श्री. मनीष नम्रपणे ग्रहण करत होते. नंतर ते त्या संतांना म्हणाले, ‘‘मला असे वाटते की, मी एक भरकटलेला जीव होतो; मात्र आता मला योग्य मार्गदर्शन मिळाले आहे आणि ‘ते पुढेही मिळत रहावे’, अशी माझी विनवणी आहे. माझ्यासारख्या बर्याच जणांना चांगले काहीतरी (साधना) करून ध्येय गाठायचे असते; परंतु आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. माझी आई धार्मिक वृत्तीची होती. माझ्या आई-वडिलांनी मला भारतातील मूल्य प्रणालीविषयी शिकवले होते. तो माझ्या जीवनाचा पाया आहे. नंतर मी भारत सोडून व्यावसायिक जगतात गेलो. तेथे केवळ चित्तभ्रम करणारी स्पर्धा आणि गोंधळ आहे. अशा परिस्थितीतही मी चांगुलपणाने रहाण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. ‘मी त्यात काही प्रमाणात यशस्वी झालो आहे’, असे मला प्रामाणिकपणे वाटते; मात्र साधनेसाठी मी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. आजचा दिवस माझ्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. माझी पत्नी माझी आध्यात्मिक शक्ती आहे. तिच्यामुळेच मी थोडीफार साधना करू शकतो. ‘ऑक्सफर्ड’ आणि ‘सरे’ या विद्यापिठांमध्ये शिक्षण घेत असलेली माझी दोन्ही मुले (रोहन आणि अरमान) शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांचे बहुतांश आयुष्य विदेशात गेले असूनसुद्धा अद्यापपर्यंत ते मांसाहार न करता सात्त्विकतेला धरून आहेत.’’
त्यांना मार्गदर्शन करतांना ते संत म्हणाले, ‘‘तुमची गेल्या जन्मीची साधना आहे. पुढच्या प्रगतीसाठी तुम्ही अध्यात्मप्रसाराची समष्टी साधना केली पाहिजे.’’
१०. आश्रमात केवळ तीन घंटे झोपूनही बर्याच कालावधीनंतर अतिशय शांत झोप मिळाल्याचे सांगणे
श्री. मनीष त्या रात्री १ वाजता झोपले आणि दुसर्या दिवशी परत जायचे असल्याने पहाटे ४ वाजताच उठले. त्यांना केवळ ३ घंटेच झोप मिळाली, तरीही ते म्हणाले, ‘‘बर्याच कालावधीनंतर मला आश्रमात ३ घंट्यांची; पण अतिशय शांत झोप मिळाली. मला फार उत्साही आणि ताजेतवाने वाटत आहे.’’
११. श्री. मनीष त्रिपाठी यांनी साधकांप्रती काढलेले कौतुकोद्गार आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !
नंतर श्री. मनीष यांनी आम्हाला पुढीलप्रमाणे कळवले, ‘मला निरोप देण्यासाठी इतर साधकांसमवेत श्री. शॉन आणि सौ. श्वेता क्लार्क पहाटे ३.४५ वाजता येऊन थांबले होते, याचे मला फार आश्चर्य वाटले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाछत्राखाली असणारे आणि अतिशय नम्र, निःस्वार्थी अन् साधकत्व असणारे असे लोक मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. एका साधकाने मला विमानतळावर आणून सोडले. आत्म्याच्या शोधार्थ माझ्या जीवनातील एवढी वर्षे घालवतांना ‘मी काय काय गमावले ?’, याचा विचार करत होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. विमानात बसण्यापूर्वी मी त्यांना मानस नमस्कार केला. मला आश्रमात जे प्रोत्साहन मिळाले, त्याचे मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. ते शब्दातीत आहे. मी माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना, मित्रवर्गाला एस्.एस्.आर्.एफ्.विषयी सांगतो, तसेच सत्त्व, रज आणि तम यांची संकल्पना, सध्याच्या कलियुगात सात्त्विकतेचा होत असलेला र्हास आणि ती टिकवून ठेवण्यासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ? ते सांगण्याचाही मी प्रयत्न करत आहे.’
श्री. मनीष यांची ओळख झाली आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकण्याची संधी दिली, याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
सौ. श्वेता क्लार्क, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०१७)