यज्ञातून प्रक्षेपित होणार्या ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांचा केलेला अभ्यास !
तमिळनाडूमधील चेन्नई येथील नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षींच्या आज्ञेने सांगितल्याप्रमाणे, तसेच अन्यही काही नाडीपट्टीवाचकांनी महर्षींच्या आज्ञेने सांगितल्याप्रमाणे वर्ष २०१६ पासून जानेवारी २०२२ पर्यंत गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ४०० हून अधिक यज्ञ झाले आहेत. या यज्ञांचे उद्देश साधकांना होत असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण होणे, साधकांना चांगले आरोग्य लाभणे, त्यांच्या साधनेत वृद्धी होणे, हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेचे कार्य निर्विघ्नपणे आणि जलद गतीने होणे इत्यादी होते. या यज्ञांच्या वेळी मला पुढील सामाईक सूत्रे शिकायला मिळाली.
१. यज्ञाला आरंभ झाल्यावर यज्ञातून प्रक्षेपित होणार्या ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांपैकी शक्तीच्या स्पंदनांचे प्रमाण सर्वाधिक असायचे. शक्तीच्या या स्पंदनांचे कार्य ‘वातावरणातील त्रासदायक शक्तीचे निर्मूलन करणे, तसेच साधकांच्या भोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण दूर करणे’, हे असायचे. हे कार्य पूर्ण झाले की, आपोआपच यज्ञाच्या स्पंदनांमुळे मूलाधारचक्र जागृत व्हायचे आणि सुषुम्ना नाडी कार्यरत व्हायची. त्या वेळी भावाची स्पंदनेही वाढलेली असायची.
२. मूलाधारचक्र जागृत झाल्यानंतर यज्ञातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे कार्य ‘साधकांच्या देहातील वाईट शक्तीच्या स्थानांतील त्रासदायक शक्तीचे उच्चाटन करणे’, हे असायचे. त्या वेळी मात्र यज्ञाला विरोध करण्यासाठी वाईट शक्तींचा जोर वाढायचा. त्यामुळे यज्ञाची शक्ती विरोध करणार्या वाईट शक्तींचा निःपात करण्यासाठी व्यय व्हायची. एकदा का वाईट शक्तींचा पाडाव झाला की, यज्ञाच्या शक्तीमुळे आपोआपच मूलाधारचक्रापासून वरची वरची चक्रे जागृत होऊ लागायची. याचा अर्थ वरच्या वरच्या चक्रांमधील त्रासदायक शक्तीचे उच्चाटन होऊन ती शुद्ध होऊ लागायची.
३. मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंतच्या चक्रांची शुद्धी झाल्यावर आपोआपच यज्ञाचा स्तर शक्तीच्या स्पंदनांवरून वाढून चैतन्याच्या स्पंदनांवर आलेला असायचा. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणचे वातावरण स्वच्छ आणि प्रकाशमान झालेले दिसून यायचे. यज्ञाला उपस्थित असलेल्या साधकांचा उत्साह वाढलेला असायचा.
४. यज्ञाच्या स्पंदनांमुळे आज्ञाचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत शुद्धी झाल्यावर आपोआपच यज्ञाचा स्तर चैतन्याच्या स्पंदनांवरून वाढून आनंदाच्या स्पंदनांवर आलेला असायचा. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणचे वातावरण हलके जाणवू लागायचे.
५. यज्ञाची स्पंदने सहस्रारचक्रावर जाणवू लागल्यावर इतका वेळ साधकांच्या लाभासाठी कार्यरत असलेली यज्ञाची स्पंदने आता समष्टी कार्यासाठी कार्यरत व्हायची. यज्ञाचे हे समष्टी कार्य यज्ञातील आहुती पूर्ण होईपर्यंत चालू असायचे.
६. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून सर्वाेच्च अशी शांतीची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित व्हायची.
७. अशा प्रकारे यज्ञातून प्रक्षेपित होणारी स्पंदने ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या क्रमाने अधिकाधिक वरच्या स्तराची अन् अधिकाधिक सूक्ष्म व्हायची. स्पंदने जेवढी सूक्ष्म, तेवढा त्यांचा परिणाम अधिक असतो.
यावरून लक्षात येते की, यज्ञातून आवश्यक ती स्पंदने आवश्यक त्या वेळी प्रक्षेपित होतात. ईश्वर काटकसरी आहे. तो स्वत:ची शक्ती अनावश्यक व्यय (खर्च) करत नाही. तो योग्य वेळी योग्य तेवढ्या ऊर्जेचाच उपयोग करतो.
यज्ञाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने या सर्व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.२.२०२२)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |