शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रोहिडेश्वरावर स्वच्छता मोहीम !
स्वछतेमुळे बुरुजाचे सौंदर्य खुलले !
रोहिडेश्वरावर स्वच्छता करणार्या शिवप्रेमींचे अभिनंदन ! यांचा आदर्श सर्वांनीच घ्यावा.
भोर – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर रोहिडेश्वरावरील (विचित्रगड) वाढलेली झाडे-झुडपे काढल्यामुळे तेथील बुरुजाचे सौंदर्य खुलले आहे. पुणे येथील ‘श्री शिवस्वराज्य प्रतिष्ठान’ आणि शिरवळ येथील ‘थर्मेक्स फाउंडेशन’च्या शिवप्रेमींनी संयुक्तरीत्या ही स्वच्छता मोहीम राबवली होती. दोन्ही प्रतिष्ठानचे १२ सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांना भोर मधील रायरेश्वर प्रतिष्ठानचे सदस्य आणि बाजारवाडी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. सदस्यांनी गडावर वृक्षारोपण केलेल्या ४०० हून अधिक रोपांच्या बुंध्यातील वाढलेले गवत काढून खत आणि पाणी घातले, तसेच गडावरील काळभैरव मंदिराच्या लोखंडी खांबाचे रंगकामही केले. शिवप्रेमींनी ८ तासांच्या परिश्रमाने बुरुजावरील वाढलेल्या वेली, झाडे काढून टाकली. त्यामुळे गडाच्या सौंदर्यात भर पडली आहे.