हिंजवडी (पुणे) येथील ‘विप्रो’ आस्थापनाच्या इमारतीतील कोवीड रुग्णालय कायमस्वरूपी बंद !
पुणे – सध्या कोरोना रुग्णांची संख्या अल्प होत असल्याने हिंजवडीतील ‘विप्रो’ आस्थापनाच्या इमारतीमध्ये चालू असलेले कोरोना रुग्णालय कायमचे बंद करण्याचा निर्णय ‘विप्रो’च्या वरिष्ठ व्यवस्थापनासमवेत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील विविध ७१ प्रकारची वैद्यकीय उपकरणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव होता. त्या वेळी जिल्ह्यातील रुग्णांसाठी जिल्हा परिषदेने ‘विप्रो’ आस्थापनाच्या साहाय्याने त्यांच्या इमारतीमध्ये रुग्णालय उभे केले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेने १५ कोटी ३३ लाख रुपये, तर ‘विप्रो’ आस्थापनाने २४ कोटी ८ लाख रुपये व्यय केले होते.