‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यापेक्षा राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श घ्यायला हवा ! – शशांक सोनवणे, हिंदु जनजागृती समिती
भारतातील तरुणांनी कोणताही ‘डे’ साजरा करण्याऐवजी संस्कृतीचे आचरण केले, तर भारत विश्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही !
पुणे, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे आणि हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करून आज युवा पिढी हिंदु धर्म आणि संस्कृती, त्यातील आचार-विचार विसरत चालली आहे. यामुळे सर्वत्र अनैतिकता आणि अनाचार बोकाळला आहे. महिला आणि अल्पवयीन मुली यांवर होणार्या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कुटुंब आणि विवाह संस्कृती लोप पावत चालली आहे. युवा पिढी अज्ञानामुळे लैंगिक आजार, नैराश्य, ताण, भीती, मानसिक आजार यांना बळी पडत आहे. हे सर्व अपप्रकार टाळण्यासाठी प्रत्येकाने हिंदु संस्कृतीचे, त्यातील प्रथा-परंपरा यांचे पालन करायला हवे. असे झाल्यास भारत विश्वगुरु बनण्यास वेळ लागणार नाही. युवकांनी ‘व्हॅलेंटाईन’चा आदर्श घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, तसेच राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श घ्यायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशांक सोनवणे यांनी केले. ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या ५ वेगवेगळ्या शाखांतील मुलांसाठी नुकतेच व्याख्यानाचे आयोजन केले होते. ५ व्याख्यानांच्या माध्यमातून एकूण ५४३ विद्यार्थी आणि २५ शिक्षक यांचे ‘व्हॅलेंटाईन डे’विषयी प्रबोधन केले.
हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर, कु. गार्गी पाटील, कु. चारुशीला चिंचकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे सचिव अधिवक्ता शार्दुल सुधाकरराव जाधव यांनी ‘विद्यार्थ्यांना हिंदु संस्कृती समजायला हवी, मुलांना आपला इतिहास आणि संस्कृती यांचा अभिमान वाटावा, यासाठी प्रतिमास व्याख्यानाचे आयोजन करा. आम्ही आपणाला पूर्ण सहकार्य करू’, असे आश्वासन दिले.
सहभागी महाविद्यालये आणि विद्यार्थी
१. प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेतील ६५ विद्यार्थी तसेच ११ वी, १२ वी मधील ४४ विद्यार्थी
२. पॅरेडाईज इंग्लीश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ५ वी ते १० वीचे १७५ विद्यार्थी
३. अधिवक्ता शार्दुल सुधाकरराव जाधवर ज्युनिअर कॉलेजमधील ११ वी, १२ वीचे विद्यार्थी, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे विद्यार्थी यांचे एकत्रित व्याख्यान झाले, तेथील दोन्ही शाखा मिळून एकूण १८१ विद्यार्थी
४. प्रा. डॉ. सुधाकराव जाधवर माध्यमिक विद्यालय आणि अधिवक्ता शार्दुल सुधाकराव जाधवर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वीचे एकूण ७८ विद्यार्थी
अशा एकूण ५४३ विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
वैशिष्ट्यूपूर्ण घटना
१. पॅराडाईज ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सौ. स्मिता कुलकर्णी यांनी ५ व्याख्यानांचे नियोजन आणि त्याचा समन्वय चांगल्या पद्धतीने केला.
२. सर्वच शिक्षकांनी व्याख्यानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘समितीचा विषय अत्यंत आवश्यक आणि मार्गदर्शक होता. आपण पुन:पुन्हा येऊन मार्गदर्शन केलेले आम्हाला आवडेल’, असे सांगितले.
३. प्रारंभी हे व्याख्यान ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार होते; परंतु पॅराडाईज इंग्लिश मिडियम शाळेच्या प्राचार्या सौ. वहिदा कळसकर यांनी व्याख्यानाचा विषय कळल्यावर ५ व्या इयत्तेपासून पुढील मुलांना आतापासूनच हा विषय कळायला हवा, त्यांच्याकडून पुढे अशा अयोग्य कृती होऊ नयेत म्हणून त्यांनासुद्धा व्याख्यानाला बसवले होते. तसेच स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाकरिता सर्व मुलांचे क्रमांक पाठवू असेही त्यांनी सांगितले.
४. विद्यार्थ्यांनी व्याख्यानापूर्वी समितीच्या कार्यकर्त्यांना सिद्धतेसाठी उस्फूर्तपणे साहाय्य केले.
५. व्याख्यानाचा प्रारंभ भगवान श्री गणेशाला प्रार्थना करून आणि श्री गणेशाचा श्लोक म्हणून केली. तेव्हा सर्वच विद्यार्थ्यांनी हात जोडून नम्रपणे मनापासून प्रार्थना आणि श्लोक यांचे उच्चारण केले.
६. १४ फेब्रुवारी या दिवसाचा दिनविशेष काय आहे ? असे व्याख्यान प्रारंभ होण्यापूर्वी मुलांना विचारले असता, पुष्कळ अल्प मुलांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ असे उत्तर दिले. याउलट ‘पुलवामा आक्रमण याच दिवशी झाले’, असे पुष्कळ मुलांनी सांगितले.
७. व्याख्यानांमध्ये विषय समजल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस साजरा न करता ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्याचे निश्चित केले. तसेच हिंदु संस्कृतीचे आचरण आणि रक्षण करण्याचा निश्चय केला. १५ विद्यार्थ्यांनी धर्मशिक्षण आणि प्रशिक्षण वर्ग यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
८. अधिवक्ता शार्दुल सुधाकरराव जाधवर ज्युनियर कॉलेज आणि इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे ‘खर्या अर्थाने निरपेक्ष प्रेम आपल्यावर आई-वडीलच करतात’, असे व्याख्यानात सांगितल्यानंतर सर्वांनी उस्फूर्तपणे टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.
९. प्रत्येक ठिकाणी व्याख्यान झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे घोषणा दिल्या.