५६ टक्के अल्पवयीन मुले सिगारेट, विड्या आणि तंबाखू सहज खरेदी करतात !

मुंबई येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांची माहिती

सरकारने तंबाखू विक्रेत्यांविषयीच्या धोरणामध्ये पालट करण्याची आवश्यकता असल्याचेही मत व्यक्त !

ज्या देशातील भावी युवा पिढी व्यसनांच्या एवढी आहारी गेली आहे, तो देश महासत्ता कसा बनणार ?

हे आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे !

( प्रतिकात्मक चित्र )

मुंबई – शाळेच्या परिसरात तंबाखू तसेच, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारी दुकाने आणि टपर्‍या यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत; परंतु तरीही या पदार्थांची विक्री पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. ५६ टक्के अल्पवयीन मुले सिगारेट, विड्या आणि तंबाखू सहज खरेदी करतात, अशी माहिती टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी रुग्णालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सिगारेट, विड्या, तसेच तंबाखू सहज उपलब्ध होत असल्याची खंत व्यक्त करून सरकारने तंबाखू विक्रेत्यांविषयीच्या धोरणामध्ये पालट करण्याची आवश्यकता असल्याचे मत या वेळी डॉ. बडवे यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला टाटा कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. सी.एम्. प्रमेश आणि आरोग्यसेवा संचालिका डॉ. साधना तायडे उपस्थित होत्या.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस’ या संस्थेच्या माध्यमातून वर्ष २०१९ मध्ये १३ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय मुलांमध्ये तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याच्या प्रमाणाचे चौथे सर्वेक्षण केले होते. यामध्ये १३ ते १५ वर्षे वयोगटातील शालेय मुलांच्या तंबाखूसेवनामध्ये ४२ टक्के घट झाल्याचे आढळून आले; मात्र दुसर्‍या बाजूला १० वर्षांहून अल्प वयाच्या मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत असल्याचे आढळून आले. यापूर्वी वर्ष २००३, २००६ आणि २००९ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.