कोकण रेल्वेमार्गावर ४ ते ७ मार्च या कालावधीत ६ गाड्या रहित

दक्षिण रेल्वेच्या दुहेरी मार्ग करण्याच्या कामाचा परिणाम !

रत्नागिरी – दक्षिण रेल्वेने पलक्कड विभागातील पडिल-कुलशेकरा विभागा दरम्यान दुहेरी मार्ग चालू करण्यासाठी कामे हाती घेतली आहेत. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या काही गाड्यांवर होणार असून ४ ते ७ मार्च २०२२ या कालावधीत ६ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. या ६ गाड्यांचे वेळापत्रक पालटण्यात आले आहे.

कोकण रेल्वेची हद्द संपुष्टात आल्यानंतर दक्षिण रेल्वेचा मार्ग लागतो. कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्‍या अनेक गाड्या दक्षिण रेल्वे मार्गावरून पुढे जातात. दक्षिण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी काही गाड्यांच्या फेर्‍या रहित केल्या आहेत. त्यामध्ये ४ मार्चची यशवंतपूर-कारवार एक्सप्रेस, ५ मार्चची कारवार-यशवंतपूर एक्सप्रेस, ५ मार्चची पुणे-एर्नाकुलम्, ६ मार्चची मंगळुरू सेंट्रल-मडगाव आणि मडगाव-मंगळुरू एक्सप्रेस आणि ७ मार्चची एर्नाकुलम्-पुणे एक्सप्रेसचा समावेश आहे.