रत्नागिरी जिल्ह्यातील ८ कातळशिल्पांना करणार राज्य संरक्षित
रत्नागिरी – कोकणात वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण अधोरेखित करणारी कातळशिल्पांना लवकरच राज्य संरक्षित केली जाणार आहेत. रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांतील ८ कातळशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव रत्नागिरी पुरातत्व विभागाने शासनाला सादर केला. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. त्यामुळे अश्मयुगी संस्कृतीच्या या ठेव्याला लवकरच राजाश्रय मिळणार आहे.
(सौजन्य : Dipak Chaughule)
कोकणात आढळून आलेल्या कातळ-खोद-शिल्पांना शास्त्रीय भाषेत ‘पेट्रोग्लीप्स’ असे म्हणतात. कोकणात आढळून येत असलेली कातळशिल्प ही जांभ्या दगडांनी युक्त उघड्या कातळ सड्याच्या पृष्ठभागावर कोरलेली आहेत. ही शिल्प एका विशिष्ट जागेत न आढळता समुद्रकिनार्यालगत सुमारे ३०० किलोमीटर अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात.
(सौजन्य : Unnayan Tours)
कोकणातील या कातळावर अश्ययुगी संस्कृती रुजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ सहस्र २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा; पण परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास त्यांचे संरक्षण आणि जतन होऊ शकते. म्हणून सुधीर रिसबूड आणि त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.