संभाजीनगर येथे शिवजयंती महोत्सवाचा जल्लोष !
ढोल-ताशे, लेझीम, तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांनी शहरात नवचैतन्य !
संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १६ फेब्रुवारी या दिवशी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने शहरात ‘शिवजागर महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे.
या वेळी अभिषेक, वक्तृत्व स्पर्धा यांसह शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी क्रांती चौक येथे शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिके करून दाखवली. या वेळी लेझीम, ढोल पथक, झांज पथक यांसह मोठ्या उत्साहात शिवरायांचा जयघोष करत उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शहरात नवचैतन्य पसरले होते.
शिवजयंतीच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवचरित्र पारायण समितीच्या वतीने विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिवचरित्र पारायण’ आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ आणि मावळे यांचा वेश परिधान करून उपस्थिती लावली होती. शिवसेनेच्या वतीने येथील क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली. या वेळी सर्वच नेत्यांची उपस्थिती होती. शिवजयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध भागांतील शिवसेना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मशाली हाती घेत यात्रा काढली.