देशाच्या सुरक्षेमध्ये ‘७ मराठा लाईट इन्फंट्री’चे योगदान

‘७ मराठा लाईट इन्फंट्री या रेजिमेंटची स्थापना वर्ष १९६३ मध्ये झाली. या रेजिमेंटने भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमा या ठिकाणी मोठे योगदान दिले आहे; परंतु त्या कामाला जेवढे महत्त्व द्यायला पाहिजे, तेवढे दिले जात नाही. एका बटालियनमध्ये अनुमाने ७५० सैनिक, १५ ते २० अधिकारी आणि ४० ते ४५ ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी (जेसिओ) असतात, तसेच सर्व बटालियन एका चमूप्रमाणे काम करते. त्यामुळे त्यांना दिलेले कार्य ते चांगल्या प्रकारे पार पाडतात. त्या त्या भागात देशाला सुरक्षित ठेवण्यात त्यांचे योगदान मोठे असते. वर्ष १९६३ नंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये मराठा रेजिमेंटच्या सैनिकांनी भाग घेतला. रेजिमेंटने दिलेल्या योगदानाविषयी सुभेदार मेजर आणि ‘ऑनररी’ (मानद) कॅप्टन विजयकुमार मोरे अन् सुभेदार मेजर चंद्रकांत चव्हाण यांचे अनुभव येथे देत आहोत.

१. सुभेदार मेजर आणि ऑनररी (मानद) कॅप्टन विजयकुमार मोरे यांचे अनुभव

१ अ. ‘७ मराठा’च्या सैनिकांनी बर्फाळ प्रदेशातील अडचणींवर मात करून आणि आधुनिक साधने नसतांना देशाची सुरक्षा करणे : ‘मी वर्ष १९६९ मध्ये नागालँडमध्ये असतांना ७ मराठा रेजिमेंटमध्ये भरती झालो. आमच्या बटालियनने विविध सीमांवर काम केले. त्यानंतर वर्ष १९९९ मध्ये मी ‘ऑनररी कॅप्टन’ या पदावरून निवृत्त झालो. वर्ष १९७६ मध्ये आमची बटालियन कानपूरहून नागालँडमध्ये येथे ‘१०२ ब्रिगेडमध्ये’ हलवली. पाकिस्तानसारख्या शत्रूच्या सैन्याला चटणीसारखे ठेचून मारायचे काम ही ब्रिगेड करते. त्यामुळे तिला ‘चटणी ब्रिगेड’ असे टोपण नाव मिळाले होते. मी चार्ली कंपनीला होतो. माझे कंपनी कमांडर मेजर बालाक्रिष्णन् होते. आमचा ‘बेस’ (तळ) नागालँडमध्ये येथे होता. तेथून आम्ही साहित्य घेऊन निघायचो आणि आम्हाला देण्यात आलेल्या विविध पोस्टवर (ठिकाणांवर) जायचो. त्या ठिकाणी सतत बर्फ पडायचा. त्या वेळी आजच्यासारखे आधुनिक पद्धतीचे पोशाख नव्हते. आमच्या वजनापेक्षाही आमच्या पाठीवर अधिक साहित्य असायचे. तेथील बर्फामध्ये आमचे गुडघ्यापर्यंत पाय अडकून पडायचे. बर्फ पडलेला नसेल, तेव्हा काचेसारख्या दिसणार्‍या बर्फावरून आमचे पाय घसरायचे. अशी कसरत करत करत आम्हाला आमच्या ठिकाणांवर जावे लागत होते. तेथे गेल्यानंतर त्या ठिकाणचे अधिकारी आम्हाला नियोजन समजावून सांगायचे. तेथे एक एल्.पी. म्हणजे ‘लिसनिंग पोस्ट’ होती. तेथे केवळ ऐकावे लागायचे. तेथून आम्हाला काही दिसायचे नाही किंवा काही हालचालही करता यायची नाही. ती चौकी बाणाच्या टोकाप्रमाणे होती. आमचे मनुष्यबळ पुष्कळ अल्प होते. रात्रीच्या वेळी आपले नाक, कान आणि डोळे सतर्क ठेवून सतत ऐकण्याच्या स्थितीत रहावे लागायचे. केवळ आवाजाचा कानोसा घेत रहायचा. पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींचा जो आवाज व्हायचा, त्यावरून आम्ही ‘वायरलेस सेट’वर (बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे) आमच्या अधिकार्‍यांना माहिती द्यायचो. त्यावरून आमचे अधिकारी पुढील कारवाई करायचे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

या ठिकाणी काम करतांना आमच्याकडे आधुनिक पद्धतीचे कोणतेही साधन नव्हते. गस्त घालायची असेल, तर आम्ही दिवसा जाऊन त्या ठिकाणावर खुणा करायचो. सायंकाळी गेल्यावर बर्फ पडल्याने आम्ही केलेल्या खुणा नाहीशा झालेल्या असायच्या. आमच्याकडे कंपास (होकायंत्र) आणि नाईट व्हीजन होते. कंपास व्यवस्थित असल्याने त्यांच्या साहाय्याने आम्ही जायचो; पण कधी कधी कंपास योग्य प्रकारे काम करायचे नाहीत. त्यामुळे आमच्या दिशा चुकायच्या. असे अनेक वेळा होत होते; परंतु आमच्या मनात कधीही नकारात्मक विचार आले नाही की, हे काम सोडून परत जावे. आम्हाला जी कामगिरी देण्यात आली, ती फत्ते (यशस्वी) करूनच आम्ही परत जायचो. त्यानंतर सर्व माहिती आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना द्यायचो. नंतर आम्ही राजस्थानमध्ये असतांना तेथे प्रचंड प्रमाणात हवा चालायची. तिला थोपवणे अशक्य होते. आम्ही आमचे जेवण आणि पाणी चांगले झाकून ठेवले, तरी त्या दोन्हीमध्ये वाळूचे कण असायचे. अशा कठीण स्थितीत ‘७ मराठा’ने भूमीवर, बर्फामध्ये आणि वाळवंटात चांगले काम केले.

१ आ. ‘७ मराठा’च्या सैनिकांना करावी लागलेली विविध कामे आणि आलेले अनुभव : एकदा तोफा बर्फामध्ये अडकल्या होत्या. त्या बाहेर काढण्याची कामगिरी ‘७ मराठा’च्या आमच्या ब्रिगेडला मिळाली होती. त्यात आमच्या सैनिकांनी अतिशय चांगले काम केले. त्यामुळे आमच्या सैनिकांचा सैन्य पदक देऊन गौरव करण्यात आला होता. आम्ही नागालँडमध्ये वर्ष १९८१ पर्यंत होतो. तेथून पुण्याला गेलो आणि तेथून आम्ही राजस्थानमधील सेक्टरला गेलो. तेथे प्रशिक्षण करायचो. त्याच वेळी कधी कधी मुंबईला संप वगैरे झाले, तर तेथेही बंदोबस्ताला जात असू. संपाच्या ठिकाणी असतांना आम्ही पांढरी रेषा आखायचो. तेथील कामगारांना ‘ही रेषा ओलांडून तुम्ही येऊ नका. पुढे आला, तर आम्ही तुमच्यावर गोळीबार करू’, अशी चेतावणी द्यायचो. आमच्या गाडीमध्ये स्थानिक अधिकारी म्हणून तेथील जिल्हाधिकारी असायचे. जेव्हा आंदोलन करणार्‍या व्यक्ती किंवा नेते ही रेषा ओलांडायचा प्रयत्न करायचे. तेव्हा त्यांच्या कंबरेखाली गोळ्या घालायचा आदेश जिल्हाधिकारी द्यायचे.

आम्ही अंदमान-निकोबार येथे गेलो होतो. तेथे लहान लहान बेटे होती. तेथे आदिवासी प्रकारचे लोक असायचे. तेथेही आमच्या बटालियनने चांगले काम केले. त्यानंतर वर्ष १९९९ मध्ये ‘ऑनररी’ कॅप्टन या पदावर असतांनाच मी निवृत्त झालो.’

२. सुभेदार मेजर चंद्रकांत चव्हाण यांचे अनुभव

२ अ. नागालँडमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणाला चोख प्रत्युतर देणे आणि त्यात ‘७ मराठा’चे ३ सैनिक हुतात्मा होणे : ‘मी १९६६ मध्ये सैन्यात भरती झालो. त्यानंतर ‘७ मराठा’चा सैनिक म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये उरी सेक्टरला पोचलो. तेथे २ वर्षे राहिलो. हैद्राबाद येथे ३ वर्षे काढल्यानंतर आम्ही नागालँडमध्ये गेलो. वर्ष १९७१ च्या लढाईपूर्वी आम्ही नागालँड, मणीपूर येथे होतो. नागालँडमध्ये असतांना आमच्यावर आक्रमण करण्यात आले होते. त्यात ३ सैनिकांना प्राण गमवावा लागला होता.

कोयमा शहराजवळ तदुबी नावाचे गाव आहे. तेथे आमचे शिबिर (कॅम्प) होते. एक दिवस आम्हाला चौक्यांवर रेशन (सामुग्री) पोचवण्याचा आदेश मिळाला. त्याप्रमाणे आम्ही सुरक्षेसाठी धान्यसामुग्रीच्या ३ वाहनांसमवेत गेलो. चौकीवरून परत येतांना सायंकाळचे ५ वाजले होते. सर्वांत पुढे असलेल्या आमच्या गाडीमध्ये सुपेकरसाहेब समोर बसले होते आणि त्यांच्या समवेत मीही होतो. आमच्या पाठीमागे २ गाड्या होत्या. मार्गामध्ये काही स्थानिक लोकांनी आमच्या वाहनासमोर शेळ्या-मेंढ्या आडव्या लावल्या आणि गोंधळ घातला. त्यामुळे आमच्या गाडीची गती अल्प झाली. आतंकवाद्यांनी प्रथम आमच्यावर गोळीबार चालू केला. सर्वप्रथम चालकाला गोळी लागली. त्यानंतर गाडीच्या खाली उतरतांना सुपेकरसाहेबांना गोळी लागली. ते दोघेही तेथेच गतप्राण झाले. अजून एकाला गोळी लागल्याने त्याचा रेडिओ संच बंद झाला. मग आम्ही गाडीखाली उड्या मारल्या. आमच्यावर चारही बाजूने गोळीबार चालू होता. मलाही गोळी लागली होती. तरीही आम्ही पूर्ण शक्तीनिशी आतंकवाद्यांवर गोळीबार केला. हा प्रतिकार एवढा होता की, त्यांचे केवळ २ माणसेच राहिली आणि बाकी सर्व ठार झाली होती. आमच्या पाठीमागील गाड्या येईतोपर्यंत आतंकवाद्यांनी पळ काढला होता. त्यानंतर आमच्या बटालियनच्या लोकांनी आम्हाला रुग्णालयामध्ये भरती केले. या आक्रमणामध्ये आमचे ३ सैनिक हुतात्मा झाले आणि काही घायाळ झाले.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.