रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जलसंवर्धनाची कामे त्वरित पूर्ण करावी ! – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख
मुंबई – सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजापूर आणि विशेष म्हणून चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरणांची नवीन आणि दुरुस्तीची कामे तातडीने करावीत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या अंतर्गत दुरुस्तीकरता प्रस्तावित कामे आणि इतर योजनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन जलसंधारणाची कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री गडाख यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील धरणांच्या प्रलंबित कामांविषयी आढावा बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, योगेश नाईक, वैभव नाईक, राजन साळवी, शेखर निकम आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चालू असलेली धरण अन् कालवे संदर्भातील कामे पूर्ण करण्याची मागणी या वेळी लोकप्रतिनिधींनी केली.
जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले,
१. रत्नागिरी जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत १४ योजना आणि महामंडळ निधीअंतर्गत ५४ अशा एकूण ६८ योजना प्रगतीपथावर आहेत.
२. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यांतील जलसंवर्धनाची चालू असलेली कामे पूर्णत्वास न्यावी.
३. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासन निधीअंतर्गत ६ योजना आणि महामंडळ निधीअंतर्गत १८ योजना अशा एकूण २४ योजना प्रगतीपथावर असून, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, दोडामार्ग या तालुक्यांतील कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे पूर्णत्वास न्यावीत.
४. या योजना पूर्ण झाल्यानंतर ११ सहस्र ९३६.०० हेक्टर सिंचनक्षमता निर्माण होऊन १ लाख ८१ हजार ३५८ स.घ.मी. पाणीसाठा निर्माण होणार असून, स्थानिकांना त्याचा लाभ मिळणार आहे. कणकवली येथील लघु पाटबंधारे योजनेचे निम्म्यापर्यंत असून, आजतागायत रुपये ३ सहस्र ३५२ लक्ष खर्च झालेला असून स्वीकृत निविदा कालावधीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.