तळेरे येथे अतीप्राचीन मूर्तीसह एक जण पोलिसांच्या कह्यात

मूर्तीची किंमत कोट्यवधी रुपये असण्याची शक्यता

सिंधुदुर्ग – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीनुसार १६ फेब्रुवारीला कणकवली तालुक्यातील तळेरे येथून पोलिसांनी सापळा रचून एका मूर्तीसह एका संशयिताला कह्यात घेतले आहे. ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ आणि अतीप्राचीन असून ती कोट्यवधी रुपये मूल्याची असल्याचे समजते.

अतीप्राचीन आणि कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेल्या मूर्तीची विक्री होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही मूर्ती कणकवली पोलिसांकडे हस्तांतरित केली. या मूर्तीच्या प्राचीनत्वाविषयी पुरातत्व खात्याकडून पडताळणी करून घेण्यात येणार आहे. ही कोणती मूर्ती आहे, हे अद्याप कळलेले नाही. मूर्तीच्या व्यवहारात काही अन्य संशयित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस करत असून लवकरच सत्य उघड होईल.