साधनेची तीव्र तळमळ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती अपार भाव असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा सोलापूर सेवाकेंद्रातील कु. अर्णव कुलकर्णी (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अर्णव कुलकर्णी हा एक आहे !
अर्णव म्हणजे समुद्र, महासागर
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ |
(‘वर्ष २०२० मध्ये कु. अर्णव कुलकर्णी याची ५७ टक्के आध्यात्मिक पातळी होती.’ – संकलक)
माघ कृष्ण पक्ष चतुर्थी (२०.२.२०२२) या दिवशी सोलापूर सेवाकेंद्रातील कु. अर्णव कुलकर्णी याचा ११ वा वाढदिवस आहे. तो १५.४ ते २५.५.२०२१ या कालावधीत कोल्हापूर सेवाकेंद्रात वास्तव्यासाठी आला होता. या कालावधीत साधकांना त्याच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली देत आहोत.
कु. अर्णव कुलकर्णी याला ११ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. जवळीक साधणे
अ. ‘कु. अर्णव कोल्हापूर सेवाकेंद्रात रहायला आल्यावर चारच दिवसांत सहजतेने सेवाकेंद्रातील सर्व साधकांमध्ये मिसळला आणि तो कोल्हापूर सेवाकेंद्रातीलच एक साधक होऊन गेला. तो त्याच्या बोलण्याने सर्वांना आपलेसे करतो.
आ. अर्णव फार प्रेमळ आहे. तो सेवाकेंद्रातील प्रत्येकाशी प्रेमाने बोलत असे आणि कुणाला काय ‘हवे-नको’ ते विचारत असे. कुणी रुग्णाईत असल्यास तो त्यांचीही विचारपूस करत असे.
२. शिकण्याची वृत्ती
त्याने शुद्धलेखन सुधारण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले. ‘नियमित शुद्धलेखन लिहिणे अन् शब्द योग्य प्रकारे लिहिणे’, यासाठी तो प्रयत्न करत असे. या कालावधीत त्याच्या ३ लहान वह्या भरल्या.
३. उत्तम निरीक्षणक्षमता
एखाद्या साधकाची बोलतांना चूक झाल्यास ते अर्णवच्या पटकन लक्षात येत असे आणि तो ती चूक संबंधित साधकाच्या लक्षात आणून देत असे. त्या वेळी ‘आपण नेमके कसे बोलले पाहिजे ?’, हेही तो त्या साधकाला सांगत असे.
४. कार्यपद्धतीचे पालन करणे
अ. एकदा त्याला प्रसाद (अल्पाहार) घेण्यासाठी उशीर झाल्याचे लक्षात आणून दिल्यावर दुसर्या दिवसापासून त्याने प्रसाद आणि महाप्रसाद यांसाठी वेळेवर येण्यास आरंभ केला.
आ. त्याचे आरतीला वेळेवर उपस्थित रहाण्यासाठी प्रयत्न असायचे. आरती झाल्यावर सामूहिक प्रार्थना सांगणे आणि अन्य गोष्टी तो मनापासून करत असे.
५. राष्ट्रपुरुषांची ओढ
त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले’ यांविषयी विशेष आवड आहे. त्याला ‘इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, धर्मवीर, राष्ट्रवीर’ यांच्याविषयी माहिती जाणून घेणे आणि त्या विषयीचे ग्रंथ वाचणे’ यांविषयी ओढ आहे.
६. व्यष्टी साधना तळमळीने करणे
६ अ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
१. अर्णव सेवाकेंद्रातील व्यष्टी साधनेच्या आढाव्याला उपस्थित रहात असे. त्याच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याचा पहिल्या दिवशी त्याने इतरांची चिंतन सारणी घेऊन तो करत असलेले प्रयत्न सांगितले. त्याच्याकडून झालेल्या चुका सांगतांना त्याच्या तोंडवळ्यावर खंत जाणवत होती. त्याची ती स्थिती पाहून आमची भावजागृती झाली आणि ‘आपण किती अल्प पडतो’, याची आम्हाला जाणीव झाली.
२. अर्णवचा पहिला व्यष्टी साधनेचा आढावा झाल्यावर त्याने स्वतःची चिंतन सारणी बनवणे, लगेच ती भरायला आरंभ करणे आणि फलकावर चुका लिहिणे या कृतींना आरंभ केला.
३. तो दिवसभरात १ घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चिकाटीने पूर्ण करत असे.
४. मिरज येथील बालसंस्कारवर्ग कु. ऐश्वर्या जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १८ वर्षे) घेत होती. अर्णवने तो वर्ग ऐकला आणि ‘यात माझे नाव नोंदवायचे आहे. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आढावा देईन’, असे आम्हाला सांगितले.
६ आ. चुका स्वीकारून त्यावर प्रायश्चित्त घेणे
१. अर्णवची आई वर्षा कुलकर्णी यांनी अर्णवच्या चुका लक्षात आणून दिल्यावर तो त्या चुका लगेच स्वीकारत असे. तो भोजनकक्षात सर्वांसमक्ष त्या चुका सांगत असे आणि या चुकांसाठी आईने दिलेले प्रायश्चित्तही पूर्ण करत असे.
२. त्याला ‘तुझी ही कृती अयोग्य आहे’, असे सांगितल्यावर तो ती चूक स्वीकारून त्यात पालट करण्याचा प्रयत्न करत असे. त्याच्या मनात कुठल्याही साधकाविषयी पूर्वग्रह नसे.
७. सेवाभाव
अ. तो सेवाकेंद्रातील सामूहिक स्वच्छतेच्या सेवेत उत्साहाने सहभागी होत असे. ही सेवा करतांना साधकांना लागणारे साहित्यही तो आवडीने आणि पुढाकार घेऊन आणून देत होता.
आ. तो रहात असलेल्या खोलीची स्वच्छताही त्याने पुढाकार घेऊन केली. त्याचा उत्साह पाहून त्याच्या समवेत सेवा करणार्या साधकांनाही उत्साह येत असे.
इ. त्याने आगाशीतील झाडांची स्वच्छता मन लावून आणि आनंदाने केली. त्याची सेवेप्रती असलेली तळमळ पाहून आम्हालाही त्याच्या समवेत सेवा करतांना चांगले वाटत असे. ही सेवा वेळेअभावी अपूर्ण राहिल्यावर ती पूर्ण करण्यासाठी त्याने पाठपुरावाही घेतला.
ई. अर्णवला झाडांना पाणी घालण्याची सेवा दिली होती. तो ही सेवा करण्यापूर्वी सूर्यदेव आणि जलदेवता यांना प्रार्थना करून झाडांना पाणी घालत असे. त्याने ही सेवा नियमित आणि भावपूर्ण केली. सोलापूरला परत जातांना त्याने झाडांना भेटून ‘मी सोलापूर सेवाकेंद्रात परत निघालो आहे’, असे सांगितले.
८. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्याप्रती भाव
त्याला मोठे झाल्यावर सद्गुरु सुश्री स्वातीताईंच्या (सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांच्या) गाडीचा चालक व्हायचे आहे. साधकांनी त्याला ‘भविष्यात गाडी नसणार, तेव्हा तू काय चालवणार ?’, असे विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘काहीही चालवेन; पण त्यांचा चालक होणार आहे. सद्गुरु स्वातीताई यांच्या समवेत असतांना मला शांत वाटते. मला त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य मिळते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकायला मिळते. सद्गुरु स्वातीताई मला पुष्कळ आनंद देतात.’’
९. निरागसपणे साधकांची क्षमायाचना करणारा अर्णव !
कोल्हापूर सेवाकेंद्रातून सोलापूर येथे जाण्यासाठी अर्णव चारचाकीत बसला होता. चारचाकी चालू झाल्यावर त्याने डोके बाहेर काढले आणि हातांनी दोन्ही कान पकडून ‘माझे काही चुकले असल्यास मला क्षमा करा’, असे सांगून सर्वांची क्षमायाचना केली. तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावरील निरागस भाव आणि प्रामाणिकपणा पाहून सर्व साधकांची भावजागृती झाली.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैवी बालकांविषयी सांगितलेली सूत्रे आम्हाला अर्णवच्या सान्निध्यात राहून शिकता आली. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता. ‘गुरुदेवा, आम्हालाही अर्णवप्रमाणे निर्मळ बनवा आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, ही गुरुचरणी प्रार्थना !’
– सौ. सुमन पेडणेकर, सौ. काव्या दुसे आणि श्री. अजय केळकर, कोल्हापूर सेवाकेंद्र, कोल्हापूर (मे २०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |