३८ जणांना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावास

कर्णावती (गुजरात) येथे वर्ष २००८ मधील २१ साखळी बाँबस्फोटांचे प्रकरण

बाँबस्फोटासारख्या प्रकरणी १४ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नसून अन्यायच म्हणावा लागेल ! अशांमुळेच जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे फावते, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ? – संपादक

अहमदाबाद येथे ७० मिनिटांत २१ बॉम्बस्फोट, २६ जुलै २००८

कर्णावती (गुजरात) – येथे २६ जुलै २००८ या दिवशी १ घंट्यांत झालेल्या २१ साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी सत्र न्यायालयाने ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची,तर इतर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासह या बाँबस्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना १ लाख रुपये, गंभीर घायाळांना ५० सहस्र रुपये, तर किरकोळ घायाळांना २५ सहस्र रुपये साहाय्य द्यावे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. दोषींच्या शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष न्यायालयाने ८ फेब्रुवारीला निकाल राखून ठेवला होता. त्या वेळी न्यायालयाने ७७ आरोपींपैकी २८ आरोपींची सुटका केली होती. या स्फोटांत सहभागी असलेल्या अन्य ८ आरोपींचा शोध अद्यापही चालू आहे. या बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार यासीन भटकळ हा देहलीतील कारागृहात, तर अब्दुल सुभान उपाख्य तौकीर हा कोचीन येथील कारागृहात आहे. या साखळी बाँबस्फोटांत ५६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २०० जण घायाळ झाले होते. या घटनेच्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

१. पोलिसांना १९ दिवसांत ३० आतंकवाद्यांना पकडण्यात यश आले होते. यानंतर उर्वरित आतंकवादी देशातील विविध शहरांतून पकडण्यात आले. कर्णावतीमधील बाँबस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिद्दीन या जिहादी आतंकवादी संघटनेच्या याच आतंकवाद्यांनी जयपूर आणि वाराणसी येथेही स्फोट घडवून आणले होते. कर्णावतीतील स्फोटाच्या दुसर्‍या दिवशी, म्हणजे २७ जुलै २००८ ला सूरतमध्येही साखळी बाँबस्फोट घडवण्याचा प्रयत्न होता.

२. साखळी बाँबस्फोटांनंतर सूरत पोलिसांनी २८ जुलै ते ३१ जुलै २००८ या काळात शहराच्या विविध भागांतून २९ बाँम्ब जप्त केले होते. त्यांपैकी १७ बाँब वराछा भागात आणि इतर कतारगाम, महिधरपुरा आणि उमरा भागात होते. चुकीचे सर्किट आणि डिटोनेटर यांमुळे या बाँबचा स्फोट होऊ शकला नाही, असे अन्वेषणातून समोर आले होते.

गोध्रा दंगलीचा सूड म्हणून इंडियन मुजाहिद्दीनकडून बाँबस्फोट !

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ७७ आरोपींविरुद्ध खटल्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली होती. एकूण ७८ आरोपींपैकी एक सरकारी साक्षीदार ठरला होता. हे आरोपी इंडियन मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘वर्ष २००२ च्या गोध्रा दंगलीचा सूड उगवण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांनी बाँबस्फोट घडवण्याचा कट रचला होता’, असा आरोप करण्यात आला होता.