जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळच्या तत्कालीन अधिवक्त्यांना ‘इसिस’ची धमकी !
आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेणार्यांना आतातरी आतंकवादाच्या तीव्रतेची जाणीव होणार का ?
पुणे – येथील जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळचे तत्कालीन अधिवक्ता जहीरखान पठाण यांना ‘इसिस’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. चेन्नईतील अधिवक्ता पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्याकडे याविषयी लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या ते जर्मन बेकरी प्रकरणात काम पहात नाहीत.
पठाण यांचे आशील असलेले महंमद दाऊद यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाच्या तडजोडीच्या निमित्ताने पठाण चेन्नई येथे गेले असतांना मौलाना नावाच्या व्यक्तीने इसिसचा माणूस असल्याचे सांगून पठाण यांना संदेश करून ‘या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडा, नाहीतर तुमच्या जिवाचे बरे-वाईट करीन’, अशी धमकी दिली.
याविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले, ‘‘पठाण यांचा अर्ज आमच्याकडे आला आहे. आम्ही या प्रकरणी संबंधिताचा शोध घेत आहोत.’’