देहप्रारब्ध भोगत अखंड अनुसंधानात रहाणारे श्री. शिरीष देशमुख यांनी गाठली ६२ टक्के तर कठीण प्रसंगांना श्रद्धेने सामोरे जाणार्याश्रीमती रेखाराणी वर्मायांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
देहप्रारब्ध भोगत असतांनाही अखंड अनुसंधानात रहाणारे रामनाथी (गोवा) येथील श्री. शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के, तर कठीण प्रसंगांना श्रद्धेने सामोरे जाणार्या फोंडा (गोवा) येथील श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
आनंद देती, आनंद देती गुरुदेव । आनंदाचे क्षणमोती उधळती गुरुदेव । डुंबवूनी आनंदसागरी उद्धरिती गुरुदेव । भवसागर पार करविती गुरुदेव ।। |
रामनाथी, गोवा – साधनेसाठी उच्चभ्रू जीवनशैली त्यागून आश्रमजीवन अंगीकारणारे आणि गेले काही मास दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) निकामी झाली असल्याने तीव्र शारीरिक त्रास भोगत असूनही प.पू. भक्तराज महाराज यांच्या ‘देह प्रारब्धावरी सोडा । चित्त (अंतर्मन) चैतन्याशी जोडा ।’ या भजनपंक्तीप्रमाणे अखंड अनुसंधानात राहून आनंद अनुभवणारे सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात इंग्रजी भाषांतराची सेवा करणारे साधक श्री. शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगात घोषित करण्यात आली. याच समवेत मुंबईतील रज-तम वातावरणात राहूनही देवाशी अनुसंधान साधून श्रद्धेने स्थिर रहाणार्या श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. ९ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. श्री. शिरीष देशमुख आणि श्रीमती रेखाराणी वर्मा यांच्यासमवेत सेवा करणारे साधक ज्या क्षणाची अत्यंत आतुरतेने वाट पहात होते, तो क्षण अनुभवण्यास मिळाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.
अशी झाली आनंदवार्तेची घोषणा !
सत्संगाच्या प्रारंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उपस्थित साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेतले. त्या वेळी साधकांनी स्वतःच्या साधनेची स्थिती, मनात येत असलेले काही नकारात्मक आणि ताणाचे विचार आदी प्रांजळपणे सांगितले. श्री. शिरीष देशमुखकाका स्वतःच्या साधनेच्या प्रयत्नांविषयी सांगतांना म्हणाले, ‘‘मी चिंता करत नाही. जे घडेल, ते स्वीकारतो. त्यामुळे मला ताण येत नाही. मी सतत देवाच्या अनुसंधानात रहाण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलाची स्वतःच्या आईवर श्रद्धा असते की, ‘ती सर्व पाहून घेईल’, तशीच माझी देवावर श्रद्धा आहे. अनुसंधानामुळे स्वतःमध्ये पुष्कळ पालट जाणवतो’, असे सांगितले. देशमुखकाकांचे हे विचार ऐकून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘श्री. देशमुखकाकांना भगवंताच्या श्रद्धेचा मोठा आधार आहे’, असे सांगून त्यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाल्याचे घोषित केले.
स्वतःच्या साधनेच्या प्रयत्नांविषयी श्रीमती रेखाराणी वर्मा म्हणाल्या, ‘‘माझी गणपतीवर पुष्कळ श्रद्धा आहे. ईश्वराने मला जीवनातील अनेक संकटांतून पार नेले आहे. आपण काहीही करत नसून सर्व काही देवच करतो. तो जे काही करील, ते चांगल्यासाठीच करील.’’ या वेळी श्रीमती वर्मा यांची कन्या नंदिता वर्मा यांनी सांगितले, ‘‘आईला माझी काही चिंता वाटत नाही; कारण तिने मला परात्पर गुरुदेवांकडे सोपवले आहे. ती कुटुंबामध्येही अडकलेली नाही. ती पुष्कळ अलिप्त आहे.’’ यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले, ‘‘मायेत राहून पण मायेपासून अलिप्त रहाणे, हे केवळ श्रद्धेनेच होऊ शकते. श्रीमती वर्मा यांच्या सहवासात जाणवणारी त्यांची आध्यात्मिक स्तरावरील गुणवैशिष्ट्ये त्यांच्या आंतरिक साधनेमुळे निर्माण झाली आहेत. त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येच दर्शवतात की, त्यांची आंतरिक साधना चालू असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’
स्वतःची आध्यात्मिक पातळी घोषित होताक्षणीच ‘सर्वांना मुक्ती मिळावी’, ही देशमुखकाकांनी केलेली प्रार्थना त्यांच्यातील समष्टीभाव दर्शवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
स्वतःची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर बर्याच साधकांचे विचार कृतज्ञतास्वरूप असतात. ‘गुरूंनी माझा उद्धार केला’, या कृतज्ञताभावात ते असतात. प्रत्येकाचा साधनामार्ग, प्रकृती, भाव आदींवर ते अवलंबून असते. देशमुखकाका यांनी स्वतःची आध्यात्मिक पातळी घोषित होताक्षणीच ‘सर्वांना मुक्ती मिळावी’, अशी प्रार्थना केली. स्वतःच्या साधनाप्रवासातील अशा अमूल्य क्षणी समष्टीसाठी प्रार्थना करणारे देशमुखकाका एकमेव आहेत. यातून त्यांचा समष्टी भाव दिसून येतो. त्यांची आंतरिक साधना जलद गतीने होत आहे, हे यातूनच दिसून येते.
आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर श्री. शिरीष देशमुख यांनी व्यक्त केलेले मनोगत
१. ‘सर्व साधकांना मुक्ती मिळावी’, हीच प्रार्थना !
‘सर्व साधकांना मुक्ती मिळावी’, हीच परात्पर गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे. माझी पातळी घोषित केल्यावर असे जाणवले की, एक जिना असून त्यातील एक पायरी चढलो. त्यामुळे आता पुढच्या गोष्टींचा विचार करूया. ‘आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली की, मनोलयाला आरंभ होतो’, असे मी पूर्वी ऐकले आहे. त्याप्रमाणे आता पुढच्या साधनाप्रवासात त्यांनी माझा मनोलय लवकर करवून घ्यावा’, अशी प्रार्थना !
(यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी सांगितले, ‘‘काकांनी किती सुंदर सांगितले आणि छान प्रार्थना केली ! त्यांची आंतरिक साधना जलद गतीने होत असून ‘त्यांचे श्रद्धेचे बोल ऐकत रहावे’, असे वाटते.’’)
२. ‘मी साधनेपासून दूर जाणार नाही’, या परात्पर गुरुदेवांच्या वाक्याने साधनेसाठी पूर्णवेळ झालो !
वर्ष २००६ मध्ये माझी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरुदेवांशी भेट झाली होती. त्या वेळी परात्पर गुरुदेव अनिष्ट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी नामजपादी उपाय करायचे. मी त्यांना त्या वेळी म्हणालो होतो की, सध्या व्यवसायात पुष्कळ गुंतलो आहे; पण माझी नाळ तुटणार नाही ना ? (साधनेपासून दूर जाणार नाही ना ?) त्या प्रसंगी ते मला म्हणाले, ‘‘तुमची नाळ तुटणार नाही.’’ त्यांच्या या एका वाक्यामुळे (संकल्पामुळे) मला पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात येता आले. ‘परात्पर गुरुदेव जे काही करतील, ते चांगल्यासाठी करतील’, असाच विचार माझ्या मनात सतत असतो.
३. सर्व भ्रम दूर करून केवळ ईश्वराची भक्ती करायची आहे !
खरेतर परात्पर गुरुदेवांना जशी प्रसिद्धीची किंवा लोकेषणाची इच्छा नसते, तसेच मला आवडते. मला एकांतात रहायला आवडते. एकांत असला की, अनुसंधान साधता येते. ‘माझे सर्व भ्रम दूर करून सर्वकाही ईश्वरच करणार आहे. मला केवळ त्याचीच सेवा अन् भक्ती करायची आहे’, असे वाटते. ‘माझ्यावर परात्पर गुरुदेवांचे प्रेम असावे’, असा विचार असतो.’
श्री. शिरीष देशमुख यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. देशमुखकाकांची जिद्द ‘तरुणांना लाजवेल’, अशी आहे !
‘मी श्री. देशमुखकाकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांची सेवा करण्याची जिद्द ‘तरुणांना लाजवेल’, अशी आहे. ‘एखाद्या विषयाचा अभ्यास करून तो इतरांना सोपा करून कसा सांगता येईल’, यासाठी ते प्रयत्न करतात. ते भक्ती आणि ज्ञान अशा दोन्ही मार्गांनी साधनेचे प्रयत्न करत आहेत.’ – आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), फोंडा, गोवा. (इंग्रजी भाषांतराची सेवा करणारे साधक)
दुपारी विश्रांतीच्या वेळेतही सेवा करण्याची सिद्धता असणे
‘देशमुखकाका कधी दुपारी विश्रांती घेत असतील आणि त्यांना त्याच वेळी एखादी तातडीची सेवा आल्याचे सांगितले, तर ते या वयातही ‘विश्रांतीची वेळ आहे, सेवा नंतर करतो’, असे कधीही सांगत नाहीत. ते म्हणतात, ‘‘माझे मनच मला साधनेसाठी (सेवेसाठी) ओढते.’’ – नंदिता वर्मा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (इंग्रजी भाषांतराची सेवा करणार्या साधिका)
यासंदर्भात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई म्हणाल्या की, मनच साधनेसाठी ओढ घेते; म्हणजे काकांची सेवा करण्याची तळमळ आहे; म्हणून रहावत नाही आणि ते सेवेला येतात. ‘अशी स्वतःची तळमळ सदोदित जागृत आहे का ?’, ते साधकांनी बघायला हवे.
(क्रमशः उद्याच्या अंकी)
उर्वरित भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/554255.html