श्री मलंगगडावरील वार्षिक उत्सवानिमित्त विविध धार्मिक विधी भावपूर्ण वातावरणात संपन्न !
ठाणे – कोरोना महामारीमुळे १५ फेब्रुवारी या दिवशी श्री मलंगगडावरील वार्षिक यात्रा होऊ शकली नाही; मात्र या उत्सवातील सर्व धार्मिक विधी भावपूर्णरित्या करण्यात आले. हिंदु मंचाच्या वतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा उत्सव साजरा करण्यात आला. हिंदु मंचाचे कार्यवाह श्री. गोपाळराव लाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदु परिषद, शिवसेना, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु मंच आदी विविध संघटनांचे कार्यकर्ते प्रातिनिधिक स्वरूपात श्री मलंगगडाच्या पायथ्याशी एकत्र आले होते. हिंदु मंचाचे अध्यक्ष श्री. दिनेश देशमुख यांनी या वेळी उपस्थितांना श्री मलंग जागरणाची माहिती दिली. या वेळी सर्वांनी ‘ॐ नमो श्री मलंगमत्स्येंद्राय’ हा नामजप भावपूर्ण केला. त्यानंतर श्रीफळ वाढवून उपस्थितांनी श्री मलंगगडावर कूच केले. रात्री १०.१५ वाजता श्री मलंगबाबांच्या समाधीस्थळी आरती करण्यात आली. ब्राह्ममुहूर्तावर श्री मलंगबाबांना गंधलेपन करण्यात आले.