श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्रीरामदासस्वामी संस्थान’च्या ‘दासनवमी महोत्सव-२०२२’ला उत्साहात प्रारंभ
सातारा, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा ते माघ कृष्ण पक्ष दशमी म्हणजे १७ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्रीरामदासस्वामी संस्थानच्या वतीने ‘दासनवमी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष तथा अधिकारी स्वामी दुर्गाप्रसाद स्वामी यांनी दिली.
महोत्सव काळात प्रतिदिन सकाळी ८ ते ९ प्रवचन, दुपारी ३ ते ४ भावगीत, भक्तीगीत, दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० सनई वादन, बासरी वादन, भजन, रात्री ९.३० ते ११ वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे.
२५ फेब्रुवारी हा महोत्सवाचा मुख्य दिवस असून या दिवशी पहाटे ४ वाजता श्रीसमर्थ समाधीची महापूजा होईल तर त्यापूर्वी २ वाजता काकड आरती, सकाळी ६.३० वाजता सांप्रदायिक भिक्षा, सकाळी १०.३० वाजता आरती, छबिना आणि प्रदक्षिणा होणार आहे. दुपारी १२ वाजता अध्यात्म रामायण, ग्रंथराज श्री दासबोध आरती, पू. सुरेश महाराज सोन्नाबुवा यांची श्रीसमर्थ निर्याणकथा होणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद होईल.
२६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता काकड आरती अन् छबिना होईल, तसेच सकाळी ७.३० वाजता राघवेंद्रबुवा रामदासी यांचे लळीताचे कीर्तन होऊन महोत्सवाची सांगता होईल.